टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 5 – येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन व श्री चक्रधर स्वामी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिक्षक दिनानिमित्त विद्यालयातील शिक्षक सी. पी. चौधरी व श्री चक्रधर स्वामी जयंतीनिमित्त शिक्षक ए. आर. महाजन यांनी अनुक्रमे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि श्री चक्रधर स्वामींच्या जीवनकार्याचा विद्यार्थ्यांना परिचय करुन दिला. याप्रसंगी मंचावर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. पाटील, पर्यवेक्षक व्ही. डी. पाटील, विद्यार्थी-मुख्याध्यापिका वैष्णवी महाजन, विद्यार्थी-पर्यवेक्षिका गायत्री धनगर हे उपस्थित होते.
तत्पूर्वी दिवसभर इ. दहावीच्या विद्यार्थिनींनी शिक्षकाची भूमिका निभावत वर्गाध्यापन केले. इ. आठवीच्या वर्गाने शिक्षक दालनाची आकर्षक सजावट केली होती. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत गुलाब पुष्प व शुभेच्छा पत्रे दिली. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष पूनम गुजराथी, समाजकार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आशिष गुजराथी यांचीही शिक्षकांसमवेत उपस्थिती होती. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात शिक्षकांविषयी आदर प्रगट करत पूर्वा महाले, वैष्णवी माळी यांनी दिवसभरात आलेल्या अनुभवांचे कथन केले. यावेळी मुख्याध्यापक एस. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी बोरसे हिने तर आभारप्रदर्शन वैष्णवी माळी हिने केले.