टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 27 : महिलांनी विविध क्षेत्रात आघाडी घेतली असून अनेक जागतिक स्पर्धामध्ये पुरस्कार प्राप्त केले आहेत. महिलांची कुस्ती देशापुरती मर्यादित न राहता जागतिक स्तरावर पोहचली आहे. स्पर्धा म्हटल्या की जय-पराजय होत असतात. परंतु, पराभवाने खूचन न जाता पुढचा सामना आपलाच असेल या भावनेने उत्कृष्ट खेळ करावा, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
महिला महाराष्ट्र केसरी विजेत्यास चांदीची गदा प्रदान करतांना महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे, वर्धा पालकमंत्री ना. पंकज भोयर व मा. खासदार रामदास तडस…
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने वर्धा जिल्हा कुस्तीगीर संघ व सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळा, देवळी द्वारा आयोजित विदर्भ केसरी रामदास तडस इनडोअर क्रीडा स्टेडीयम देवळी येथे ‘महिला महाराष्ट्र केसरी किताब लढत 2024-25 व वरीष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार अनिल बोंडे, आमदार राजेश बकाने, आमदार सुमित वानखेडे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व माजी खासदार रामदास तडस, आमदार प्रताप अडसड, आमदार उमेश यावलकर, जिल्हाधिकारी वान्मथी सी., पोलीस अधीक्षक अनुराग जैन, माजी खासदार सुरेश वाघमारे, भाजप जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट, माजी नगराध्यक्ष शोभा तडस आदी यावेळी उपस्थित होते.
डाव खेळतांना दोन्ही महिला पहिलवान.
महाराष्ट्र महिला केसरी किताबासाठी कोल्हापुरची अमृता पुजारी व पुणे जिल्ह्याची भाग्यश्री फंड यांच्यात रोमांचक सामना रंगला. या सामन्यात भाग्यश्री फंड हिने विजय मिळवित महिला महाराष्ट्र केसरी किताब पटकविला. तर कोल्हापूरची अमृता पुजारी उपविजेता ठरली.
महसूल मंत्री श्री. बावनकुळे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व माजी खासदार रामदास तडस राजकारण व कुस्तीच्या फडातले उत्कृष्ट पहेलवान आहेत. देवळी सारख्या तालुक्याच्या ठिकाणी उत्कृष्ट इनडोअर स्टेडियम उभारुन राज्यस्तरीय उत्कृष्ट स्पर्धा आयोजित केल्या ही कौतुकाची बाब आहे. खेलो इंडियाच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. खेळाडूंना चांगल्या दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजे. यासाठी येणाऱ्या बजेटमध्ये क्रीडा क्षेत्राला भरीव तरतुद राहणार असल्याचे ते म्हणाले.
महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यात आलेल्या महाराष्ट्रातील नामवंत खेळाडूंचे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने स्वागत करून पालकमंत्री डॉ. पंकज भोयर पुढे म्हणाले, जिल्ह्यात खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. यासाठी आवश्यक त्याबाबींसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल यासाठी प्रस्ताव सादर करावा, असे ते म्हणाले
यावेळी माजी खासदार रामदास तडस, खासदार अनिल बोंडे, आमदार राजेश बकाने यांनीही मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र महिला केसरी विजेता भाग्यश्री फंड यांना मानाची चांदीची गदा देण्यात आली. तसेच स्पर्धेत विजेत्या आणि सहभागी खेळाडूंचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी केले.
टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 03 - शहरातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना सुरक्षित, सुलभ आणि प्रेरणादायी मतदानाचा अनुभव देण्यासाठी चोपडा...