टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 19 : रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बुरांडे ले-आऊट परिसरात एका दुचाकी चालक तरुणीला एका दांपत्याकडून दिनांक 18 जानेवारी रोजी किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली. याबाबत पिडीत तरुणीच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई व तपास सुरु आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिडीत तरुणी ही बुरांडे लेआऊट येथून आपल्याला कामाच्या ठिकाणी जात असताना एका युवकाने तरुणीच्या दुचाकीला अडवुन जुन्या विषयावरून तिच्याशी हुज्जत घालून अरेरावी केली व घटना स्थळावरून पळ काढला. यामुळे सदर तरुणी घाबरली व रस्त्याकडेला थांबून आपल्या नातेवाईकाना फोनद्वारे कळवू लागली असताना समोरून चारचाकी वाहनातं माजी सैनिक सुधीर फरकडे व त्याची पत्नी कल्पना फरकडे यांनी तू रस्त्यावर का उभी आहे? तुझ्या बापाचा रस्ता आहे का? आमच्या गाडीला जायला जागा नाही, असे म्हणून त्या तरुणीसोबत वाद घातला. सरतेशेवटी तो वाद वाढून त्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले व तसा व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल झाला आहे. यामध्ये माजी सैनिक सुधीर फरकडे व कल्पना फरकडे रा. बुरांडे ले-आऊट, आलोडी यांनी ऋचिका वसंत ठाकरे रा. सुदर्शन नगर, पिपरी मेघे या तरुणीला मारहाण केली. सदर तरुणी सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे, अशी माहिती मिळाली आहे.
त्यामुळे तरुणीला मारहाण करणाऱ्यांवर रामनगर पोलीस स्थानकात भारतीय दंड संहिता कायद्यान्वये कलम 115 (2), 117 (2), 126 (2), 352, 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर आदींच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रभारी ठाणेदार राजेश जोशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक खोब्रागडे व पोलीस शिपाई निलेश वाघमारे पुढील तपास करीत आहे.