टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 01 : कुठल्याही स्पर्धेत यश अपयश महत्वाचे नसून सहभाग महत्वाचा आहे. क्रिडा व कलागुणातू शिक्षणासोबतच बुध्दीमत्तेत वाढ होण्यासोबतच आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत होते, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी शालेय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा क्रिडा संकल येथे जिल्हा स्तरीय शालेय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला शिक्षिणाधिकारी प्राथमिक नितू गावंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा.ज.पराडकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी डॉ. मंगेश घोगरे, आर्वी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे आदी मंचावर उपस्थिती होते.

दैनंदिन जिवनात शिक्षणासोबतच सुदृढ आरोग्य असणे तेवढेच महत्वाचे असून आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी क्रिडा व कलागुण विद्यार्थ्यांच्या अंगी असणे आवश्यक आहे. या क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवातुन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल असे पुढे बोलतांना जितीन रहमान म्हणाले.
गेल्या तीन दिवसापासुन सुरु असलेल्या शालेय क्रिडा स्पर्धेत जिल्ह्यातील वर्धा, आर्वी, कारंजा, आष्टी, देवळी, हिंगणघाट, समुद्रूपूर, व सेलू या पंचायत समिती मधील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध खेळामध्ये व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला. या महोत्सवात प्रथम, व्दितीय तृतीय क्रमांक पटकविलेल्या पंचायत समिती निहाय शाळेच्या संघांना जितीन रहमान यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. सर्वसाधारण स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरीसाठी आर्वी पंचायत समिती चषक देऊन गौरविण्यात आले.









