लोकप्रवाह, चोपडा दि. २५ : नवभारत वृत्तपत्र समुहाच्यावतीने आयोजित नवराष्ट्र सन्मान सोहळा – २०२२ मध्ये गलंगी ता. चोपडा येथील सुहास रामलाल देवराज यांना ‘नवराष्ट्र खान्देशरत्न’ या पुरस्काराने जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी खा. उन्मेष पाटील, आ. शिरीष चौधरी, आ. राजूमामा भोळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील व नवभारत समूहाचे ग्रुप प्रेसिडेंट ए. श्रीनिवास आदिंची प्रमुख उपस्थिती होती. या सन्मानाबद्दल सुहास देवराज यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
दोन वर्षे जीवघेण्या कोरोनाची होती. या काळात कुणीच कुणाच्या जवळही जात नव्हते, अशा परिस्थितीतदेखील काही ‘देवदूतां’ नी जनसेवा केली. अवकाळी पाऊस असो, अथवा इतर नैसर्गिक संकट असो. अशा संकटसमयी सामान्यांची सेवा करून एक आदर्श उभा करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी नवराष्ट्र सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती आणि इतरांपुढे एक आदर्श म्हणून पुढे यावे, यासाठी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजता कै. भैय्यासाहेब गंधे सभागृह, ला. ना. हायस्कूल स्टेडियमजवळ, जळगाव येथे उत्साहात पार पडला.
याप्रसंगी सुहास देवराज यांनी सहपरिवार उपस्थित राहून हा पुरस्कार स्विकारला. यावेळी त्यांचे वडील रामलाल देवराज, लहान भाऊ किरण देवराज, राहुल देवराज आदिंसह कुटुंबातील इतर सदस्यांची उपस्थिती होती.