लोकप्रवाह, वर्धा दि. ८ – राज्यात तसेच विदर्भात अतिवृष्टीमूळे आणि इतर अनेक कारणामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान झाले आहे, त्यातून तो सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. आता खरीप हंगाम नंतर येणारा जो रब्बी हंगाम त्यामध्ये तरी शेतकऱ्यांना पीक सूरळीत घेता यावे याकरीता सरकारने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांना रात्री महावितरणकडून शेतीसाठी काही तासांसाठी वीजपुरवठा केला जातो. याच वेळेमध्ये शेतकऱ्यांना त्यांची कामे करावी लागतात. यामध्ये मशिनवर आधारित कामे, पिकांना पाणी देणे आदि सगळी कामे रात्रीच्या अंधारात करावी लागतात. त्यासाठी दिवसभर राबराब राबलेल्या शेतकऱ्यांना रात्रदेखील जागून काढावी लागत आहे हि शोकांतिका आहे.
रात्री अंधारात शेतात गेलं की, साप चावून किंवा विजेचा धक्का लागून मृत्यू होण्याचे प्रमाण सद्या वाढल्याचे दिसून येत आहे. रात्री देण्यात येणारी वीजदेखील पूर्ण दिली जात नसल्यामुळे या खंडीत वीजपुरवठ्यामुळे मोटर जळणे, पाईपलाईन फुटणे अशा घटनांनी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेती कामांसाठी दिवसा किमान ८ ते १० तास वीजपुरवठा करावा तसेच पिकाला योग्य हमीभाव मिळावा. हि मागणी यावेळी करण्यात आली.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा आयोगा ने देखील अन्न धान्य पुरवठा चा उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने उत्पादनात वाढ, दर्जेदार उत्पन्न मिळविणे यासाठी शेतीला अखंडित वीजपुरवठा करावा व पुढे शेतकऱ्यांची (Farmer) थेट कोणतीही (MSEDCL) वीज बंद करू नये, तोडू नये यासाठी राज्य सुरक्षा आयोगाने आदेश पारीत केले आहे. त्या आदेशाचा पण तातडीने अंमलबजावणी होण्याची गरज आहे.हा आदेश राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे, आयोगाच्या सदस्य प्रिती कृष्णा बेतुले व आयोगाचे सचिव प. फ. गांगवे यांनी पारीत केले आहे… त्यामुळे या सर्व मुद्यावर विचार करून शेतकऱ्या ना दिवसा सुरळीत पणे विज देण्याची मागणी संघर्ष अॕग्रो ग्रुप आणि स्वराज्य संगठन प्रणित छावा क्रांतिवीर सेना यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सदर मागणीवर योग्य ती कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले.
निवेदन देतेवेळी अतुल शेंडे, नंदू मून, प्रशांत अवचट, राहुल मून, संदीप रघाटाटे, आकाश सुखदेवे आदिंची उपस्थिती होती.