लोकप्रवाह, वर्धा दि. ८ : येथील पिपरी मेघे ग्रामपंचायत हद्दीतील हनुमान टेकडी परिसरातील असलेल्या आदिवासी गृह निर्माण सहकारी संस्थेच्या मालकीच्या जागेवरील मुरुम हा विना शासकीय परवानगी उत्खनन व अवैद्य पद्धतीने वाहतूक केल्यामुळे सरपंच अजय गौळकार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन सुखदेव गणपतराव उईके, सदस्य गण नागरीक तथा माजी उपाध्यक्ष महात्मा ज्योतिबा फुले आदिवासी गृहनिर्माण सहकारी संस्था पिपरी (मेघे) यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. मात्र अद्यापपावेतो यावर कुठलीच कारवाई होत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे !
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिपरी मेघे ग्रामपंचायत हद्दीतील हनुमान टेकडी येथे महात्मा ज्योतिबा फुले आदिवासी गृह निर्माण सहकारी संस्था कार्यरत असून संस्थेला हनुमान टेकडीवरील जागा शासनातर्फे देण्यात आली आहे. त्या संपूर्ण जागेची देखभाल व वापर संस्थेतर्फे केल्या जातो. परंतु दिनांक १२ व १३ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ग्रामपंचायत पिपरी (मेघे) वर्धा येथील सरपंच अजय गौळकार यांनी संस्थेची कुठलीही परवानगी न घेता अवैधरित्या टेकडीवरील मुरूम जेसीबी क्रमांक MH-३२ AH-३१२३ याने उत्खनन करुन स्वमालकीच्या टिप्पर वाहन क्रमांक MH-३१ CQ-५६६० व MHQ-३४३० या वाहनांद्वारे वाहण्यात आला. याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी तहसीलदार यांचे नाव सांगून संस्थेच्या मालकीच्या जागेवरील अंदाजे २५ टिप्पर भरून मुरूम अंदाजे किंमत रु.१५००००/- (रु. दिड लाख मात्र) चा मुरूम वाहून नेला असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. सदर अवैद्य गौणखनिज वाहतुक करतांना त्यांना तेथील रहिवाश्यांनी विचारणा केली असता तहसीलदार, वर्धा यांच्या आदेशाने हा मुरूम ग्रामपंचायत हद्दीतील नवीन स्मशानघाट येथे वापरण्यात येत असल्याचे सरपंच यांनी सांगितले. मात्र संस्थेच्या मालकीच्या जागेवरून सरपंच अजय गौळकार यांनी कोणतीही शासकीय परवानगी अथवा रॉयल्टी न देता हा मुरूम वाहतूक करण्यात आल्यामुळे संबंधित सरपंच अजय गौळकार यांचेवर चोरीचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.
वरील सर्व प्रकार हा सीसीटिव्हीत कैद झालेला आहे तसेच तक्रार करुन जवळपास २० दिवस लोटूनही कुठल्याच प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेत संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी जातीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.
वरील सर्व प्रकाराबाबत लोकप्रवाह टिमने वर्धा तहसीलदार रमेश कोळपे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. मात्र जर का सदर प्रकरणामध्ये सरपंच दोषी असतील तर शहानिशा करुन त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नुकतेच रुजू झालेले नुरुल हसन यांनी यामध्ये लक्ष घालावे जेणेकरुन संबंधितांना न्याय मिळेल, असे बोलल्या जात आहे.