लोकप्रवाह, चोपडा दि. ११ – सन १९४२ मध्ये जी क्रांती झाली त्यावेळी भारत छोडो तशी आता भारत जोडो यात्रा आहे. देशाची एकता एकात्मता टिकली नाही तर भारत शून्य होईल. भारत जोडो यात्रा देशाची एकता एकात्मता राहण्यासाठी आहे असे प्रतिपादन माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले.
चोपडा येथे भारत जोडो पदयात्रा नियोजन संदर्भात काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) व इतर समविचारी पक्षांची बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार कैलास पाटील, भारत जोडो यात्रा जिल्हा समन्वयक तथा माजी जिल्हाध्यक्ष अॕड. संदिप पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, चोसाका माजी अध्यक्ष अॕड. घनश्याम पाटील, जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्ष इंदिराताई पाटील, चोसाका अध्यक्ष अतुल ठाकरे, जिल्हा बँक संचालक डॉ. सुरेश पाटील, अनिल पाटील, नगरसेवक किशोर चौधरी, माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, अजबराब पाटील, जमील शेख, ज्ञानेश्वर कोळी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, रमेश सोनवणे, प्रकाश रजाळे, नौमान काझी, फातिमा पठाण, धिरज गुजराथी, हरीश पवार, के.डी.चौधरी, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील आदी होते.
अरुणभाई गुजराथी पुढे म्हणाले की, ही यात्रा परिवर्तनाची यात्रा आहे. मागील आठ वर्षात काय झाले? आताच्या राजकारणात मी राजकारणी आहे असं सांगायला सुद्धा लाज वाटते. गलिच्छ राजकारण झाले आहे. राजकारणात विश्वासार्हता गमावली जात आहे.
देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही. स्वातंत्र्य मिळवितांना जो सत्याग्रह केला होता. त्याची आठवण या पदयात्रा मधून येत आहे. यामुळे भारतात चैतन्य निर्माण झाले आहे. मतभेद विसरा, तरूणांना संधी द्या. तरुण गमावलेला आहे, संघटना गमावली आहे हे जागृत करण्याचे काम राहुल गांधी करीत आहे. “ब्र”शब्द काढला तरी जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. आज देशाची अर्थव्यवस्था कुठे जात आहे? सर्व प्रकल्प विकून टाकले जात आहेत. देशाला ग्रहण लागले आहे. राहुल गांधी यांना साथ देऊन पदयात्रा मध्ये सामील व्हावे. असे चोसाका माजी अध्यक्ष अॕड. घनश्याम पाटील यांनी सांगितले.
देशाचे भवितव्य मजबूतीसाठी हि यात्रा काढण्यात आली आहे. सामान्य माणसाचा विश्वास निर्माण करण्यासाठी ही यात्रा आहे. हे काम राहुल गांधी समविचारी पक्षांना घेऊन करीत आहेत. देशाचे भवितव्य मजबूत करण्यासाठी ही यात्रा आहे. यावरच देशाचे भवितव्य ठरवणार. या यात्रेत गोरगरिब व आदिवासी बांधव सामील झाले असल्याचे प्रतिपादन आमदार शिरीष चौधरी यांनी केले.
२०१५ साली नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा परत येईल,१५ लाख खात्यामध्ये जमा होतील असे खोटे आश्वासन जनतेला दिले. सामान्य माणूस उघड्या डोळ्यांनी सर्व पाहत आहे. ज्यांच्यासाठी भांडत आहोत तेही हात बांधून आपल्याकडे पाहतात ते विदारक चित्र संपूर्ण देशात निर्माण झाले आहे. विरोध करायला कोणी तयार नाही. बोलला की ईडी आणि सीडी लावली जाते. जाती- जातीत, धर्मा-धर्मात तेढ निर्माण करून, जातीय राजकारण करून हा देश खिळखिळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणून राहुल गांधी रस्त्यावर उतरले आहेत. जळगांव जिल्ह्यातून २०० एसटी बसेस रवाना होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दिली.
यावेळी अॕड. संदीप पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शेतकरी कृती समितीचे एस बी पाटील, चोसाका उपाध्यक्ष शशिकांत देवरे, मधुकर पाटील, अॕड. एस डी पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views: 381