लोकप्रवाह, चोपडा दि. २८ – कैलास पाटील हे महादेवाचे भक्त असून त्यांना महादेवाचा मोठा आशीर्वाद आहे ते महादेवाचे भक्त असून त्यांनी मला विधानसभेत पाडून टाकले तर बाकीच्यांचे काय राहिले. भाजप पैनल चे ‘सूतगिरणी बचाव’ हा शब्द मला आवडला नाही सहकारात राजकारण नको. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही देखील प्रयत्न केले, मात्र ते होऊ शकले नाही. चोपडा तालुक्यात सूतगिरणीमध्ये सभासद करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्याने एक सभासद बनवला असेल तर मला दाखवा असे जाहीर आवाहन माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी लासुर येथील सहकार पॅनलच्या मेळाव्यात बोलतांना केले.
लासुर येथील नाटेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी सहकार पॅनलच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, या मेळाव्याला अध्यक्षस्थानी माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अॕड. संदीप पाटील, माजी आमदार व उमेदवार कैलास पाटील, माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, कारखान्याचे माजी चेअरमन अॕड. घनश्याम पाटील, चोसाकाचे चेअरमन अतुल ठाकरे, कृउबासचे माजी सभापती सुरेश पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. प्रदीप पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जि.प. सदस्य प्रा. नीलम पाटील, उद्धव ठाकरे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख रोहिणी पाटील व प्रा. ए.के. गंभीर यांसह अनेक मान्यवर या मेळाव्याला उपस्थित होते.
यावेळी सूतगिरणीचे चेअरमन माजी आमदार कैलास पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, प्रत्येक निवडणुकीत तालुक्यात मतदारांसमोर जात असताना त्यांनी सहकाराच्या प्रकल्पाबाबत लोक नेहमी विचारतात. मी बंद पडलेली सूतगिरणी चालू केली. सूतगिरणी चालू व्हावी म्हणून तालुक्यातील सर्व नेत्यांनी मला शेअर्स करून दिले. दोन वर्षाच्या आत शेतकऱ्यांचा कापूस कसा खरेदी करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. चोपडा सूतगिरणीमध्ये विजेचा फार मोठा खर्च असून तो वाचवण्यासाठी पूर्ण सूतगिरणीत मी सोलर प्रकल्प उभारणार असून कोणाचाही भाग भांडवल न घेता सूतगिरणी उभी करून दाखवणार असून लवकरच त्या सूतगिरणी मध्ये जिनिंग प्रेसिंगही सुरू करणार असल्याचे कैलास पाटील यांनी सांगितले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यात खडका व नगरदेवळा या सूतगिरण्या बंद पडल्या आहेत. फैजपूरचा कारखाना विक्री झाला आहे, जिल्ह्यात अनेक संस्था बंद असून या बाबींमुळे मनाला दुःख होते. आपण चोसाका भाड्याने दिला आणि आज तो मोठ्या दिमाखात सुरू आहे, त्याचप्रमाणे माजी आमदार कैलास पाटील यांनी बंद पडलेली सुतगिरणी चालू करून दाखवली. ज्यांचे सहकारावर प्रेम आहे त्यांच्या हातात सूतगिरणीचे भवितव्य द्यावे. तसेच नजीकच्या कारखान्यांपेक्षा चोपडा साखर कारखाना हा पन्नास रुपये जास्त भाव देईल असे माझे बोलणे झाले आहे. कोरोना काळात जीडीपी हा शेतकऱ्यांमुळे टिकून राहिलेला आहे. भाजपचेही काही लोक मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत सूतगिरणी मध्ये होते. त्यांनी काय काम केले आणि आता सूतगिरणी बचाव पॅनल म्हणून गावागावात फिरत असतांना त्यांच काय योगदान होते? असाही सवाल अरुणभाई गुजराथी यांनी यावेळी उपस्थित केला असून सहकार पॅनलच्या सर्वच्या सर्व जागा विजयी होतील, अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मेळाव्याचे सूत्रसंचालन चोसाकाचे माजी संचालक रमेश जे. पाटील यांनी केले.
Post Views: 264