लोकप्रवाह, चोपडा दि. १४ जाने. (संदिप ओली) – येथील चोपडा शेतकरी सहकारी संस्थेची निवडणूक लागली असून २१ जागांसाठी तब्बल १७१ अर्ज आले असल्याचे नवल तालुक्यात होत असताना, पुन्हा ऐकावे ते नवलच अशी घटना उघडकीस आली आहे. निवडणुकीत एका माजी संचालकाने आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणतीही थकबाकी नसल्याचा दाखला मिळविण्यासाठी चक्क बंद बँक खात्याचा धनादेश देत चोपडा साखर कारखान्याची दिशाभूल वजा फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत सविस्तर असे की, चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली असून, उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराकडे कोणतीही थकबाकी नको ही सर्वसाधारण अट असते. याच्या पुर्ततेसाठी चोसाकाचे मागील संचालक मंडळातील संचालक निलेश दत्तात्रय पाटील (चहार्डी) यांनी कारखाना प्रशासनास बंद बँक खात्याचा धनादेश देत आपल्या नावावरील थकबाकी भरली असा दाखला मिळविला. व चोसाका निवडणुकीत पुन्हा उमेदवारी दाखल केली. मात्र चोसाका प्रशासनाने सदर धनादेश वटविण्यासाठी बँकेत टाकला असता तो धनादेश बंद खात्याचा असल्याने तो न वटल्याचे निदर्शनास आले. त्यावरून चोसाकाचे कार्यकारी संचालक अकबर पिंजारी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांना कळवले आहे. यासंदर्भात कार्यकारी संचालक अकबर पिंजारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. सदर प्रकारामुळे चोसाकाची प्रथमदर्शनी फसवणूक झाली असल्याचे सांगितले. तसेच काही कायदेशीर बाबी तपासून सदर प्रकरणी १३८ ची नोटीस देखील पाठविणार असल्याचे सांगितले.
जो धनादेश दिला होता तो बंद खात्याचा होता याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांना तसे पत्र पाठवून सदर संचालक थकबाकीदार आहेत. असे नमूद केले आहे त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेतील. तत्पूर्वी सदर रक्कम आरटीजीएस प्रक्रियेने आज दि. १३ रोजी चोसाका खात्यात जमा केली आहे
अकबर पिंजारी
प्र.कार्यकारी संचालक
Post Views: 436