टिम लोकप्रवाह, हिंगणघाट दि. ०४ जून – येथील उपजिल्हा रुग्णालयाचे जिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यात येणार असून रुग्णालयात शासनाने अतिरिक्त ३०० रुग्ण खाटांना मंजुरी प्रदान केली असल्यामुळे आता हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातील खाटांची संख्या ४०० होणार आहे पर्यायाने वैद्यकीय सुविधेत मोठी भर पडणार आहे अशी माहिती आमदार समीर कुणावार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत बोलतांना आमदार कुणावार म्हणाले की, गत दोन वर्षापासून याबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होतो .शासनाने उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून याबाबतचे परिपत्रक सुद्धा जारी केले आहे. उपजिल्हा रुग्णालयात आरोग्याच्या सुविधा वाढाव्या याकरिता सतत प्रयत्नशील आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून १०० खाटांचे हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय ४०० खाटाचे झाले पाहिजे याकरिता सतत प्रयत्न होता. या संदर्भामध्ये गेल्या वर्षभरापासून सरकारकडे पत्र दिले होते. त्यानंतर मार्च अधिवेशन काळात मुंबई येथे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सदर प्रस्ताव बघितला असता पूर्णपणे निगेटिव्ह आहे ,असे त्यांचे म्हणणे होते. कोणत्याही परिस्थितीत हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन झाले पाहिजे, असा मी त्यांच्याकडे आग्रह केला. त्यांनी लगेच कमिशनर मुंबई यांना सांगितलं की यांचा प्रस्ताव तातडीने माझ्यासमोर सादरकरा आणि त्यांनी त्या प्रस्तावावर ओव्हररुल चा शेरा मारून सदर प्रस्ताव वित्त विभागाकडे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे पाठवला. त्यानंतर अधिवेशन काळात मी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सह्याद्री या निवास स्थानी जाऊन भेट घेतली. त्यांनी सांगितले ४०० खाटांचे रुग्णालयाला फार मोठा निधी लागेल. तालुका स्थळावर एवढा मोठा निधी देता येणार नाही.माझ्या आग्रहानंतर याबाबत विचार विनिमय करतो व विभागाची चर्चा करतो, असे त्यांनी सागितले. हिंगणघाट येथे ४०० खाटांचे रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा पाहिजे. अशी आग्रही भूमिका मी त्यांचे समोर मांडली.त्यानंतर माझा पाठपुरावा सुरूच होता आणि शेवटी मागणीला यश आले. लोकप्रतिनिधीनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे या ठिकाणी जिल्हा शासकीय रुग्णालय मंजूर करण्यात येत आहे,या आशयाचे आरोग्य विभागाने परिपत्रक काढलेले आहे. ही हिंगणघाटच्या जनतेसाठी आणि या विधानसभा क्षेत्रातील जनतेकरीता अतिशय गौरवाची बाब आहे. महाराष्ट्रामध्ये तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय हे अपवाद आहे. या सुविधेमुळे शहरातील आणि परिसरातील ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्याच्या सुविधा मिळणार आहे . अनेक तज्ञ डॉक्टर, वैद्यकीय उपकरणे व मशीन याठिकाणी येणार आहे . सिव्हिल सर्जन ची सुद्धा नियुक्ती होणार आहे, असे आमदार कुणावार यांनी सागितले .
कार्यसिद्धीचा आनंद : हिंगणघाट येथे उपजिल्हा रुगणालय श्रेणीवर्धित करण्याचा शासनाचा निर्णय हा ऐतिहासिक आहे. या निर्णयामुळे रुग्णांच्या सुविधेसाठी आपण काही करू शकलो याचे समाधान असून कार्यसिद्धीचा आनंद झालेला आहे. या रुग्णालयाच्या श्रेणीवाढ करण्यासाठी प्रयत्नरत असलेले सर्व राजकीय पक्ष व संघटनांचे मी अभिनंदन करतो, हिंगणघाटच्या विकासासाठी सर्व एकजूट असले पाहिजे, हाच हिंगणघाटचा इतिहास राहिला आहे, असे आमदार समीर कुणावार म्हणाले.
सरतेशेवटी आमदार कुणावार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आभार मानले. पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा, किशोर दिघे , विजयसिंह मोहता , प्रा डॉ उषाताई थुटे , वामन खोडे, वसंत पाल, नितीन मडावी,आकाश पोहाणे, आशिष पर्बत, काश्मीर बत्रा, सुभाष कुंटेवार, वामन चंदणखेडे आदी उपस्थित होते.