टिम लोकप्रवाह, वर्धा, दि. 5 – पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरीकांनी किमान एक झाड लावून ते जगविणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त जनजागृती निर्माण करून पर्यावरण रक्षणासाठी सामुहिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वर्धाचे उपवनसंरक्षक राकेश शेपट यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धा तर्फे महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्था (एमगिरी), सुष्म, लघु एवं मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकार आणि जैव प्रसंस्करण एवंम जडीबुटी विभाग (एमगिरी) यांच्या सहकार्याने मगनवाडी परिसरातील राजकला टॉकीज रोड येथील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्था (एमगिरी) येथील सभागृहात जागतिक पर्यावरण दिन विशेष प्रचार प्रसार अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश चव्हाण, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी बुध्ददास मिरगे, एमगिरीचे उपनिदेशक तपस रंजन, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत उपस्थित होते.
श्री. शेपट पुढे म्हणाले की, पर्यावरण समतोल राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने लहान-लहान गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करून कुठेही कचरा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. भारतातील स्वच्छ शहरांच्या यादीत वर्धेचा कसा समावेश होईल, याकरीता सर्व नागरीकांनी स्वच्छ वर्धेचा संकल्प करण्याची गरज आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीने किमान एक झाड जगवून पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. श्री. महेश चव्हाण म्हणाले की, घरातील कचरा हा प्लास्टीक पिशवीत टाकणे टाळायला हवे. ओला कचरा तथा सुका करचा याची विभागणी करावी. दररोजच्या वापरात प्लास्टीकचा वापर कमी करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. श्री. मिरगे म्हणाले, सर्वाधिक पर्यावरणाची हानी प्लास्टीकमुळे होत आहे. त्यामुळे आपण नकळतपणे निसर्गाच्या समतोल ढासळण्यास जबाबदार ठरत आहोत. त्याकरीता प्रत्येक नागरीकांनी प्लास्टीक मुक्तीचा संकल्प करून त्या दिशेने पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चित्रकला व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून एमगिरीचे व्ही. राव, टी. राजन यांनी काम पाहिले. बक्षिस विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे
चित्रकला स्पर्धा
1) श्रेया कांबळे, प्रथम बक्षीस
2) पायल काठले, द्वितीय बक्षीस
3) किरण मोहिते, तृतीय बक्षीसरांगोळी स्पर्धा
1) पायल चाफले प्रथम बक्षीस
2) कोमल देठे, द्वितीय बक्षीस
3) श्यामली जामणे, तृतीय बक्षीस
यावेळी एमगिरीच्या जैव संस्करण विभागाचे उपनिदेशक डॉ. आदर्शकुमार अग्निहोत्री आणि उर्जा एवं संरचना विभागाचे दीप वर्मा यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थी व उपस्थित नागरिकांना पर्यावरणाचे महत्व पटवून दिले. प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी केले. संचालन प्रमुख वैज्ञानिक अधिकारी अपराजिता वर्धन यांनी केले, तर आभार स्वानंद कळंबे यांनी मानले.