टिम लोकप्रवाह, वर्धा दि. ०७ जून – भारतात दिवसेंदिवस बदलत चाललेल्या राजकीय सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा विपरीत परिणाम भारतातील प्रत्येक नागरिकांवर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भारत लोक संख्येच्या दृष्टीने जगात प्रथम क्रमांकाचा देश असून भारतात अनेक तरुण पिढी बेरोजगारीच्या खाईत लोटत आहे दारिद्र्य, बेरोजगारी, अंधश्रद्धा, धर्मवाद, भाषावाद, जातियवाद, प्रांतवाद, सरकारी विभागाचे खाजगीकरण, शेतकऱ्यांचा शेतीमाला योग्य भाव न मिळणे यासारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
सध्या बदलत्या भारताच्या आणि महाराष्ट्राच्या एकूण परिस्थितीकडे बघितलं असता एक वेगळ्याच पद्धतीने राज्यकारभार सुरू आहे, असे जाणवते. मोठ्या संख्येने असणाऱ्या ओबीसी समाजावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे विदर्भ तेली समाज महासंघातर्फे संपूर्ण विदर्भभर समाजातील विविध प्रकारच्या समस्या जाणून घेण्यासाठी या संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या संवाद यात्रेचे नेतृत्व विदर्भ तेली महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ शेंडे, सरचिटणीस डॉ, नामदेव हटवार करणार आहे. सोबत संघटक प्रा. रमेश पिसे, युवा आघाडीचे प्रमुख शेषराव गिरीपुंजे, कुष्णा बेले, सहसचिव संजय सोनटक्के राहणार आहे. तरी गुरुवार दिनांक ८ जून रोजी जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, अशी विनंती विदर्भ तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ पिसे व सतिश ईखार यांनी केली आहे.