टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 0– राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरीतक्रांती व श्वेतक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र कृषी दिन साजरा केल्या जातो. त्याच अनुषंगाने कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत आठवडाभर विविध कार्यक्रम राबविण्यात आले. त्याचा समारोप आज रोजी करण्यात आला. येथील पंचायत समिती सभागृहात गट विकास अधिकारी भरत कोसोदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी डी. बी. साळुंखे यांनी माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा गौरव करून हरितक्रांती व श्वेतक्रांतीबाबत माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांसमोर आजच्या परिस्थितीत असलेल्या समस्यांबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे पिक विमा, पीएम किसान, E केवायसी, MREGS आदि कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.
याप्रसंगी रब्बी हंगाम 2022-23 पीक स्पर्धेत रब्बी ज्वारी, हरभरा व गहू या पिकांचे विक्रमी उत्पादन घेऊन प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळालेल्या शेतकऱ्यांचा रोपे देऊन येथोचित्त सत्कार करण्यात आला. तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या तालुक्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांचाही रोपे देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी माचला येथील प्रगतीशील शेतकरी डॉ. रविंद्र निकम यांनी पाणी आडवा पाणी जिरवा, वृक्ष लागवड तसेच कार्बन क्रेडिट याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात गट विकास अधिकारी भरत कोसोदे यांनी उत्पादन खर्च कमी करणे तसेच उत्पादीत मालाचे मूल्यवर्धन करणे याबाबत आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. एच. महाजन यांनी तर आभारप्रदर्शन विस्ताराधिकारी सोनवणे यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचायत समितीचे कृषी अधिकारी डि. एम. शिंपी, अडावद, चोपडा व हातेड येथील मंडळ कृषी अधिकारी, समस्त कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक आदिंसह कृषी कार्यालयातील इतरांनी परिश्रम घेतले.
Post Views: 575