समृद्धी महामार्गावरून नागपूरहून पुण्याकडे येत असलेल्या एका खासगी प्रवासी बसला शनिवारी (1 जुलै) पहाटे दीडच्या सुमारास बुलडाण्यानजीक अपघात झाला. या अपघातात परिणित यांनी सर्वस्वच गमावलं.
विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला झालेल्या या अपघातात 25 जण जागीच ठार झाले तर 8 जण बचावले आहेत. जीव गमावावा लागलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहून प्रत्येकाचंच मन हेलावलं आहे.
मृतांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांचं प्रवासाचं कारण आदी गोष्टी आता समोर येत आहे. यामध्ये कुणाला नवी नोकरी लागलेली होती. तर कुणी अॅडमिशनचं काम करून घरी परतत होतं.
या बस अपघाताने मृतांच्या कुटुंबीयांचं होतं नव्हतं ते सगळं हिरावून घेतलेलं आहे. तर, काही कुटुंबांवर झालेला आघात तर कधीच भरून निघण्यासारखा नाही.
पुण्यातील पिंपळे सौदागर परिसरात राहणारे परिणित वनकर यांनाही असाच एक आघात सोसावा लागला. 40 वर्षीय परिणित वनकर यांनी समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघातात आपली आई, पत्नी आणि मुलीला यांना गमावलं.
परिणित यांच्या वडिलांचा मृत्यू दोन वर्षांपूर्वी कोरोना संसर्गामुळे झाला होता. दोन वर्षांच्या कालावधीत आपल्या कुटुंबातील 4 सदस्यांना गमावल्यानंतर परिणित घरी एकटे उरले आहेत. परिणित वनकर हे पिंपळे सौदागर परिसरातील जरवरी सोसायटीमध्ये 2014 पासून राहत होते. ते एका मोठ्या कंपनीत नोकरी करतात. शनिवारी पहाटे गाडीचा अपघात झाल्यानंतर पहाटे चारच्या सुमारास परिणित वनकर यांना अपघाताची वार्ता कळली. ही माहिती मिळताच परिणित आपल्या मेहुण्यासोबत घटनास्थळी रवाना झाले होते.
परिणित यांची आई शोभा वनकर (वय 60), पत्नी वृषाली वनकर (वय 38) आणि मुलगी ओवी वनकर (वय 2) या नागपूरहून पुण्याकडे येत होत्या. पंधरा-वीस दिवसांपूर्वी वनकर कुटुंबीय नागपूरला गेलं होतं. तिथे नातेवाईकांचं लग्न आणि सुटी घालवण्यासाठी त्यांनी हे नियोजन केलं होतं. आठ दिवसांपूर्वी परिणित हे एकटे पुण्याला परतले. त्यानंतर त्यांचा फोनवरून त्यांच्या कुटुंबीयांशी रोज संवाद व्हायचा.
अपघातापूर्वी बस ही वाशिममधील कारंजा याठिकाणी काही वेळ जेवणाच्या विश्रांतीसाठी थांबलेली होती. तिथेही परिणित यांचं आपल्या कुटुंबीयांशी बोलणं झालं. आई, पत्नी आणि मुलीशी बोलून त्यांनी गाडी कुठेपर्यंत आली याची चौकशी केली, तसंच पुण्यात पहाटे घ्यायला येतो, असं सांगून त्यांनी फोन ठेवला. पण, कुटुंबीयांचं हेच बोलणं शेवटचं ठरलं.
फोनवरून अपघाताची माहिती मिळाल्यानंतर परिणित बुलडाण्याकडे रवाना झाले. पण या तिघांचाही बस अपघातात मृत्यू ओढावल्याचं समजल्यानंतर परिणित यांच्या पायाखालची जमिनच सरकली. घटनास्थळावरील भयंकर परिस्थिती पाहून त्यांना जो धक्का बसला, तो शब्दांमध्ये व्यक्त करण्यासारखा नाही. परिणित म्हणाले, “माझी आई, पत्नी आणि मुलगी अपघातात गेली आहे. माझी विनंती आहे की या अपघाताची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. माझ्यासोबत जे घडलं, ते इतर कुणासोबतही घडू नये.”
ते म्हणाले, “रात्री कारंजा लाडला गाडी थांबली होती, त्यावेळी माझं माझ्या मुलीसह कुटुंबीयांशी बोलणं झालं होतं. आम्ही आता जेवत आहोत, त्यानंतर झोपतो. उद्या सकाळी तुम्ही पुण्यात घ्यायला या, असं मला त्यांनी सांगितलं. “यानंतर मला पहाटे चार वाजता फोन आला. याच फोनवरून मला अपघाताबाबत सांगण्यात आलं. मी ताबडतोब पुण्यावरून निघालो. इथे आल्यानंतर घडलेली घटना पाहताच मला धक्का बसला. माझा खूप मोठा घात झाला आहे. माझे वडील दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले होते. माझं कुटुंबच संपलं आहे, वडील दोन वर्षांपूर्वी कोरोनाने गेले होते. आता घरचे हे तिघेही गेले.”
या घटनेला कोण जबाबदार आहेत, दोषींवर काय कारवाई व्हावी, असा प्रश्न परिणित वनकर यांना विचारला असता ते म्हणाले, “हे प्रशासनाचं काम आहे. या प्रकरणात न्यायालयीन चौकशी नक्कीच व्हावी. यामध्ये जो कुणी दोषी असेल, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी.” “माझं जे नुकसान या अपघातात झालं आहे. ते कधीच भरून निघणारं नाही. किती काही केलं तरी त्याची भरपाई होणार नाही. माझं दुःख मलाच माहिती आहे. याव्यरितिक्त माझी इतर काही अपेक्षा नाही. मी इतर काहीही आशा कुणाकडून करत नाही,” असं परिणित वनकर यांनी म्हटलं.