टिम लोकप्रवाह, वर्धा दि. १४ – जिल्ह्यात एका अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. येथे बैल पोळ्याचा सण असल्याने गावात सण साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू होती. अशातच बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता-पुत्राचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हिवरा परिसरात ही घटना घडल्याचं समजतं आहे. या घटनेने गुंजखेडा गावावर शोककळा पसरली आहे. राजू पुंडलिक राऊत (५३) व चंद्रकांत राजू राऊत अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी राजू राऊत यांचे शेत हिवरा शिवारात आहे. यामुळे राजू व त्यांचा मुलगा चंद्रकांत हे दोघेही जवळील तलावातील पाण्यात बैलांना धुण्यासाठी घेऊन गेले होते. यावेळी बैल धुताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात गटांगळ्या घेत बुडाले. यामध्ये दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावात पसरताच गावात शोकमग्न वातावरण होते. या घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मुलगा चंद्रकांत याचा मृतदेह तलावाबाहेर काढला असून वडील राजू यांचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी पुलगाव पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून पंचनामा सुरू आहे.