टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २५ – येथील रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे आयोजीत पाचव्या रोटरी उत्सवाची सांगता उत्साहात करण्यात आली. दि १९ ते २२ जानेवारी या कालावधीत शहरातील हरेश्वर मंदिर रस्त्यावरील खानदेश प्रेस या ठिकाणी भव्य अशा पाच एकर जागेवर आयोजीत करण्यात आले होते. हा रोटरी उत्सव तालुकावासियांना उत्साह तर देऊन गेलाच तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालही यानिमित्ताने याठिकाणी झाली. माजी विधानसभाध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली, रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या प्रांतपाल आशा वेणुगोपाल, तालुक्याच्या आमदार सौ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन व जैन उद्योग समूहाचे चेअरमन अशोक जैन, प्रांताधिकारी एकनाथ बंगाळे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, डॉ. निर्मल टाटीया, मंगीलाल सौदांणकर यांच्या तसेच अनेक मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झालेल्या उद्घाटन सोहळ्यानंतर चार दिवस याठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तर रोटरी उत्सवाच्या सांगता प्रसंगी रोटरीचे माजी प्रांतपाल शब्बीर शाकीर हे उपस्थित होते.
प्रभुजी आणि विशेष बालकांसाठी खास आयोजन
या रोटरी उत्सवात रोटरी क्लबच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी तालुक्यातील वेले येथे असणाऱ्या मनोरुग्ण प्रभुजींसाठी तसेच शहरातील प्रेरणा मतिमंद विद्यालयाच्या विशेष विद्यार्थ्यांसाठी व वस्तीगृहाच्या विद्यार्थिनींसाठी विशेष आयोजन केले होते. या प्रभुजी आणि विद्यार्थ्यांनी प्ले झोन मधील अनेक खेळांचा मनसोक्त आनंद लुटला. तसेच विविध खाद्यपदार्थांची चव चाखली. नव्या कोऱ्या वाहनातून या विद्यार्थ्यांना परिसराची सफर घडवण्यात आली. रोटरीच्या या विशेष प्रयत्नांचे तालुकाभरातून कौतुक होत आहे. या महोत्सवात तालुक्यातील कारसेवकांचांही सत्कार माजी प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला यांच्या हस्ते करण्यात आला.
लाखोंची आर्थिक उलाढाल
या महोत्सवात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. उत्सवात गृहपयोगी वस्तूंचे तसेच कपड्यांचे अनेक स्टॉल्स असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांनी खरेदी केली. तसेच खाद्यपदार्थांची ही मोठ्या प्रमाणात विविध स्टॉल्स असल्याने नागरिकांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. वाहन स्टॉल्सधारकांनी उत्सवात केलेल्या वाहनांच्या बुकिंगवर मोठ्या प्रमाणात सूट दिली. उत्सवात अनेक वाहनांची देखील विक्री झाली.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
उत्सवादरम्यान चारही दिवस सायंकाळी शहरात व तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालयांनी विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात प्रामुख्याने शिवराज्यभिषेक, श्री राम जन्म, श्री रामाचे अयोध्या आगमन, एज्यूकेशनल थीम साँग, प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या चोपडा शाखेतर्फे श्रीराम झांकी यासह विविध लोकगीते व सिनेगितांचा यामध्ये समावेश होता. दरम्यान उत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना लकी ड्रॉ मधून आकर्षक बक्षिसे देण्यात आली. रोटरी क्लबच्या सदस्यांनी सादर केलेला ऑर्केस्ट्रा देखील उपस्थितांना भावला.
उत्सवातील विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन विलास पी. पाटील, सुरेखा मिस्त्री, गौरव महाले, संजय बारी यांनी केले. तर रोटरी उत्सवाच्या आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे. चेतन टाटिया, सचिव अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख डॉ. ईश्वर सौंदणकर, सहप्रकल्प प्रमुख अरुण सपकाळे, अविनाश पाटील, बी. एस. पवार, विपुल छाजेड यांच्यासह सर्व रोटरी सभासदांनी अथक परिश्रम घेतले.
Post Views: 288