टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २६ – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शनि मंदिर ते चावडी पर्यंतच्या असणाऱ्या मेन रोडवर दुतर्फा केलेल्या अतिक्रमणामुळे सर्वसामान्य नागरिकांना रहदारीस अडथळा निर्माण होतो. यातून लोटगाडी दुकानादार व दुचाकी स्वारामध्ये तुतु मैमै होवून याचे रुपांतर भानगडीत होते. त्यामुळे शहरातील सामाजिक स्वास्थ व्यवस्थित रहावे याकरीता शहर पोलीस स्टेशन प्रभारी अजित सावळे यांच्या टिमने संपुर्ण मुख्य रस्त्याच्या दुतर्फा व रहदारीस अडथळा निर्माण करीत असलेल्या दुकानावर कारवाई करीत रस्ता मोकळा केला. पोलीसांच्या या कारवाईचे शहरातील सुज्ञ नागरिकांनी कौतुक केले.
शहरात अतिक्रमण वाढु नये ही जवाबदारी चोपडा नगरपरिषदेची असते. मात्र नगरपालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरात ठिकठिकाणी अतिक्रमणाचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. ठिकठिकाणी असणाऱ्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद होत चालले आहेत. सुरुवातीलाच जर अतिक्रमणावर अकुंश लावला तर ते वाढणार नाही. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देवून कारवाई करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे. आज जी कारवाई शहर पोलीसांकडून करण्यात आली आहे त्या पथकामध्ये सहा. पोलीस निरिक्षक अजित सावळे, पोलीस उपनिरिक्षक भुसारे, पोहेकाँ. संतोष पारधी, विलेश सोनवणे, ज्ञानेश्वर जवागे, सुभाष सपकाळ, पो.ना. संदिप भोई, मधुकर पवार आदिंसह इतर पोलीसांचा समावेश होता.