टिम लोकप्रवाह, जळगाव दि. ०६ – जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्र राज्यातील आशावर्कर व गटप्रवर्तक या गेल्या 12 जानेवारीपासून बेमुदत संपावर आहेत. सरकारने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मानधन वाढ, भाऊबीज देणे, जेएसवाय लाभात एपीएल व बीपीएल भेदभाव केला जाणार नाही तसेच गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी म्हणून मान्यता देण्यात येईल अशा दिलेल्या आश्वासनाचे परिपत्रक काढावीत म्हणून आशा व गटप्रवर्तक यांचा गेल्या २५ दिवसापासून चाललेल्या संपात सहभाग असून यामुळे ग्रामीण भागातील गरीब जनतेचे आरोग्यसुविधेअभावी हाल होत आहे.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या संपाच्या तब्बल 25 दिवसानंतरही सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार शासकीय परिपत्रक काढलेले नाही. म्हणून सदर परिपत्रक काढून हा संप ताबडतोब मिटवावा, यासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस येत आहे. त्यादिवशी राज्यातील सर्व आशा कर्मचारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे येथे जाणार आहेत. या शुभेच्छा मोर्चाचे महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना कृती समितीने आयोजन केले आहे. या शुभेच्छा मोर्चात जिल्ह्यातून जळगाव तालुक्यातील 200 आशा व गटप्रवर्तक सहभागी होणार आहेत. तसेच 12 फेब्रुवारी रोजी सोमवारी जिल्हा परिषदेवर आशा व गटप्रवर्तक यांचे जेलभरो आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. अमृत महाजन, सचिव सुलोचना साबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भायेकर यांना सादर केले. यावेळी प्रतिभा पाटील, प्रगती पाटील, वैशाली भिडे, जनाबाई सुंबे, वर्षा वाणी, सुनिता बडगुजर, कविता सपकाळे, निर्मला सोनवणे, सरला वाणी, मंगला पिंगळे, तसेच गटप्रवर्तक सुनिता ठाकरे, सुरेखा साळुंखे, छाया मोरे, वनिता बारी, अपेक्षा माळी, जयश्री सूर्यवंशी, सुवर्णा न्हावी आदिंसह जळगाव व भुसावळ तालुका आशा व गटप्रवर्तक संघटनेचे इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील शहरी, नागरी, ग्रामीण व आदिवासी भागातील आशा व गटप्रवर्तक यांनी कोणत्याही दडपणाला बळी न पडता संप यशस्वी करावा, असे आवाहन आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.