टिम लोकप्रवाह, वर्धा, दि. ०२ (सचिन ओली) – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत उद्या दिनांक ०३ मार्च रोजी शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी समन्वय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभाकक्षामध्ये पोलिओ लसीकरण नियोजनाच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रा.ज. पराडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस, पल्स पोलिओ सल्लागार डॉ.एस.आर. ठोसर, जिल्हा क्षयरोग अधीक्षक डॉ. हेमंत पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. या मोहिमेकरिता जिल्ह्यामध्ये एकुण १ हजार ३३५ लसीकरण केंद्र कार्यरत असणार आहेत. ग्रामीण भागामध्ये १ हजार १२६ तर शहरी भागामध्ये २०९ बुथ असणार आहेत.
या ठिकाणी मिळणार पोलीओ लस
जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय, घराजवळील बूथ, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, मोबाईल व्हॅन बूथ आदी भागांमध्ये लसीकरण उपलब्ध असेल.
पोलीओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण मोहीमेचे नियोजन करण्यात आले आहे. ३ मार्च २०२४ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत ही लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहणार नाही, यासाठी दिनांक ४ ते ९ मार्च २०२४ दरम्यान आयपीपीआय अंतर्गत घरोघरी जाऊन बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. या लसीकरण मोहीमेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.