टिम लोकप्रवाह, वर्धा दि.०८ : वर्धा जिल्ह्यातील आर्वी वनपरिक्षेत्रातील नियत क्षेत्र लहादेवी मौजा क्रमांक ८७ वनसंरक्षित वनामधील मौजा लहादेवी जवळ एका नाल्यानजीक वनरक्षक पथक गस्ती करत असताना ६ मोर वन्यप्राणी मृत अवस्थेत तर एक मोर जिवंत अवस्थेत आढळून आले. याबाबत सविस्तर माहिती घेतली असता शिकार करणाऱ्यां पैकी आरोपी सुरपाल जीवाणशींग बामणे याला अटक करण्यात आली.
वनविभागातर्फे प्राप्त माहितीनुसार आर्वी वनपरिक्षेत्रातील सहवन क्षेत्र आर्वी नियत क्षेत्र लहादेवी कक्ष क्रमांक ८७ संरक्षित वनात लहादेवीजवळ एका नाल्यानजीक वनरक्षक यांच्या गस्ती दरम्यान वन्यप्राणी ०६ मोर मृत अवस्थेत तर एक मोर जिवंत अवस्थेत आढळून आले. वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन जाधव व सागर कुटे तसेच त्यांचे अधिनिष्ठ वनकर्मचारी यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पाहणी करताना त्यांनी प्रथम एक जिवंत मोराला पशुवैद्यकीय अधिकारी हरी यांच्याकडे उपचारासाठी पाठविण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान सदर मोराचा सुद्धा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मोरांना मका व तूर या धान्यासोबत कीटकनाशक मिश्रण करून पाण्याच्या सूत्राजवळ ठेवले असल्याचे दिसून आले. मृत असलेल्या सहा मोरांना पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून शव विच्छेदन करून तत्पश्चात सारंगपूर येथे दहन करण्यात आले. शवविच्छेदना दरम्यान प्रयोग शाळेत पाठविण्यासाठी मोरांचे अवयवाचे नमुने वनविभागातर्फे घेण्यात आले आहे. लवकरच हे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन जाधव यांनी यावेळी दिली.
सदर मोर शिकार प्रकरणात आरोपी नामे सुरपाल जीवाणसिंग बामणे यांच्या विरुद्ध वनजीवन संरक्षण कायदा अधिनियम 1972 चे कलम 2 (16, 2, (36), 9, 51, नुसार आरोपीस तपासाकरीता ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपी सुरपाल जीवाणसिंग बामणे हा मध्यप्रदेश येथून महाराष्ट्रात आला असून लाहादेवी परिक्षेत्रामध्ये त्याने मकत्यांनी शेती करत असल्याची माहिती प्राप्त झाली असून त्यांच्या घरूनच विषारी द्रव सुद्धा वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जप्त केल्याची माहिती आहे.
सदर कारवाई उपवनसंरक्षक राकेश शपट व जिल्हा सहाय्यक संरक्षक गजानन बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन जाधव व सागर कुटे यांच्या नेतृत्वात आर्वी वनपरिक्षेत्रातील वनरक्षक प्रवीण तंबाखे, जाकिर शेख आदिंसह इतर वनरक्षकांच्या पथकाने केली आहे.