टिम लोकप्रवाह, वर्धा, दि. 13 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत असून याचा इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी योजनेच्या जनजागृती कार्यक्रमात केले. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक न्यायभवन येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. कमल पोटदुखे, अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. रुपेश कुच्चेवार, कुंभलकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. अरविंद धोंगडे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक प्रसाद कुळकर्णी आदी उपस्थित होते.
इतर मागासवर्गीयांसाठी योजना, मोदी आवास घरकुल योजना, इतर मागाव वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रिशिप, आयटीआयच्या विद्यार्थ्यांना निवार्ह भत्ता, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, धनगर समाज घरकुल येाजना, तांडा वस्ती सुधार योजना, भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश मिळवून देणे, सैनिक शाळेत शिकणा-या विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे व वसतीगृह प्रवेश बाबत योजना, शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, धनगर समाजासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनाची जनजागृती करण्यात आली.
यावेळी मान्यवरांचे हस्ते इतर मागासवर्गीयांसाठी शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी प्रवेश निश्चितीचे प्रमाणपत्र व विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना टॅबचे व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद कुळकर्णी यांनी केले तर संचालन विकास पल्हाडे यांनी केले. कार्यक्रमाला समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.