टिम लोकप्रवाह, वर्धा, दि. 13 : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. निवडणुका निर्भय वातावरणात पार पडाव्या तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी पोलीस प्रशासन व महसूल विभागाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पोलीस अधीक्षक नुरूल हसन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावीत, उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, आर्वीचे उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व पोलीस निरीक्षक यावेळी उपस्थित होते.
मतदान केंद्रातील आवश्यक सुविधा व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी तत्पर रहाणे आवश्यक आहे. निवडणूक कामातील टाळाटाळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
महसूल व पोलीस विभागाने आपसांमध्ये समन्वय ठेवावा. निवडणुकीसाठी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे. समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या फेकन्यूजवर पोलीसांच्या सायबर विभागाने बारकाईने लक्ष द्यावे. स्ट्रॉगरुम, मतदान केंद्र, चेकनाके आदी ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवावा. जिल्ह्यातील संवेदनशील असलेल्या मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेऊन खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाने विशेष काळजी घ्यावी. यावेळी सी-व्हिजील व ई-एसएमएस बाबत माहिती देण्यात आली. तसेच पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.
तसेच लोकसभा निवडणुकीत पेडन्युजला आळा घालण्यासाठी विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी यावेळी दिल्या. माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात करण्यात आली. या समितीची पहिली बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. पोलीस अधीक्षक नुरूल हसन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावीत, उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, समितीचे सदस्य तथा उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव श्वेता पोटुडे-राऊत, समितीचे सदस्य प्रकाश कथले, अजय तिगावकर, सायबरचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यावेळी उपस्थित होते.
निवडणुकीच्या कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्या संदस्यांनी आपसामध्ये समन्वय साधून कामे करावी. निवडणूक कालावधीमध्ये उमेदवारांना प्रचार साहित्याचे वेळेत प्रमाणिकरण देण्यासाठी प्राधान्य द्यावे. तसेच समाज माध्यमांवर लक्ष केंद्रीत करुन आक्षेपार्ह पोस्टवर समितीने वेळेत कार्यवाही करावी, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.