टिम लोकप्रवाह, वर्धा दि. १४ – तारासावंगा येथून आष्टी कडे जाणारी एसटी बस रस्त्यात बंद पडली. त्यामुळे तिला सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांना खाली उतरवून धक्का मारावा लागला. तरीही बस सुरू झाली नसल्याने विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तारासावंगा येथून आष्टी हे २५ किलोमीटर अंतरावर आहे. तारासावंगा येथून जवळपास २० विद्यार्थी व विद्यार्थीनी शाळा व महाविद्यालयाकरिता याच बसने रोज ये-जा करतात. आष्टीला जाण्यासाठी माणिकवाडामार्गे ही बस जाते. या बसमध्ये माणिकवाडा येथील विद्यार्थी देखील जातात.
मंगळवारी सकाळी भल्या पहाटे ६ : ३० वाजेच्या दरम्यान ही बस मोठा माथ्याच्या खाली अचानक बंद पडली. तारासावंगा ते माणिकवाडा हे ४ किलोमीटर अंतर आहे. परंतु सर्वत्र जंगलव्याप्त भाग असून, या ठिकाणी हिंस्त्र प्राण्यांचा वावर असतो. भल्या पहाटेला व रात्री उशिरा येणाऱ्यांना बऱ्याचदा या भागात पट्टेदार वाघ, बिबट आदी वन्यप्राण्यांचे दर्शन देखील होत असते. अशातच राज्य परिवहन महामंडळाच्या अशा भंगार बसेसमुळे विद्यार्थांना व प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव आहे. अनेकदा याबाबत विद्यार्थ्यांनी नवीन बसेस उपलब्ध करून देण्यासाठी मागणी घातली. परंतु यावर अजूनपर्यंत तोडगा निघालेला नाही. यामुळे विद्यार्थांना वेळेवर पोहोचणेदेखील शक्य होत नाही. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी तत्काळ लक्ष देत नवीन बस व रात्री मुक्कामाला येणारी ही बस परत सुरळीत करावी अन्यथा तारासावंगा, वाडेगाव, माणिकवाडा व जामगाव येथील सर्व विद्यार्थी एकत्रित येत रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून मुक्कामाला येणारी तारासावंगा ते आष्टी बस मुक्कामी येत नाही. सकाळी ६ ला निघणारी बस उशिरा सकाळी ६.३० ते ७ पर्यंत येते व बसदेखील भंगार येतात. यामुळे वेळेवर पोहचणे शक्य होत नाही. उशिरा वर्गात पोहोचल्याने पहिला वर्ग चुकतो यामुळे शैक्षणिक नुकसान होते आहे.
– मंथन प्रमोद बालपांडे, विद्यार्थी, तारासावंगा.
आज सकाळी पहाटेला बस मोठ्या माथ्याच्या खाली बंद पडली. यामुळे मध्य जंगलात बसमधून खाली उतरावे लागले. भंगार बसला अनेक धक्के देऊनदेखील बस सुरू झाली नाही. या भागात वाघ, बिबट आदींसारख्या प्राण्यांचा वावर असल्याने भीतीचे वातावरण तयार झाले होते.
– हेमलता कडू, विद्यार्थिनी, तारासावंगा