टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २५ – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी ग्रॅज्युएशन सेरेमनीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ.रक्षिता पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, दीप्ती पाटील, सुचिता पाटील आणि दिपाली पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना शाळेतील मुख्याध्यापिका यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या स्टॅशिया टॉशर यांच्या मते “मुल उद्या काय होईल याची आपल्याला काळजी वाटते, तरीही आपण हे विसरतो की तो आज कोणीतरी आहे.”
मुले नर्सरी ते सिनियर केजी पर्यंत झपाट्याने वाढतात आणि विकसित होत असतात. ते उत्सुक आणि उत्साही राहिले पाहिजेत. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शिक्षक सदैव प्रयत्नशील असतात.
“लहान बियाण्यांपासून, शक्तिशाली झाडे वाढवा.” या उक्तीनुसार मुलांना सशक्त, समंजस बनण्यासाठी त्यांना खोलवर रुजण्याची गरज आहे. प्रत्येक दिवशी आपण त्यांना आशा, दयाळूपणा आणि प्रेमाने पाणी दिले पाहिजे. आपण त्यांना ज्ञान, चारित्र्य, चांगले आचरण, चांगल्या सवयी आणि समर्पण या पोषक तत्वांचा आहार दिला पाहिजे. आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून ते सर्जनशीलता, कुतूहल, बुद्धिमत्ता, नागरिकत्व आणि नेतृत्वाने बहरतील.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सिनियर के.जी. रोज व जास्मिन विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध गाणी, गोष्टी, पाढे, हिंदी वाचन इत्यादी उत्तम प्रकारे सादर केले. विद्यार्थ्यांमध्ये पुढील इयत्तेत जाण्याचा मोठा उत्साह दिसून आला. विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा परिधान केली होती. ग्रॅज्युएशन सेरेमनीला सीनिअर के.जी. च्या विद्यार्थ्यांनी के.जी. विभागाचे शिक्षण पूर्ण करून के.जी. ची डिग्री मिळविल्याचे प्रमाणपत्र कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. रक्षिता पाटील व शाळेचे समन्वयक अशोक साळुंखे ह्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी काही पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या पाल्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व इतर अनेक क्षेत्रातील झालेल्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका माधुरी पाटील आणि मनीषा चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका कामिनी पाटील, जुईली ठाकरे, शितल भावसार यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता.
Post Views: 77