टिम लोकप्रवाह, वर्धा दि.19 – महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील वर्धा समाज कार्य संस्थानच्या वतीने राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार द्वारे अनुदानित ‘वृद्धांचे कल्याण, सशक्तिकरण आणि सुरक्षेचा स्वदेशी दृष्टीकोन’ या विषयावर दि. 19 व 20 मार्च रोजी अशा दोन दिवसीय परिसंवादाच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षीय भाषण करतांना कुलगुरू डॉ. भीमराय मेत्री म्हणाले की, प्रत्येक कुटुंबाने ज्येष्ठांचा आदर केला पाहिजे. नव्या पिढीने ज्येष्ठांच्या अनुभवांचा फायदा घेऊन त्यांचे कल्याण, सक्षमीकरण आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
परिसंवाद सत्राचे उद्घाटन मंगळवार दि. 19 मार्च रोजी कस्तूरबा सभागृहात झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. विजेंद्र कुमार, वर्धा समाजकार्य संस्थानचे निदेशक प्रा. बंशीधर पांडे आणि सह-संयोजक एसोशिएट प्रा. डॉ. के. बालराजु मंचावर उपस्थित होते. या परिसंवादात विविध राज्यातील 150 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले. कुलगुरू डॉ.भीमराय मेत्री म्हणाले की, बदलत्या परिस्थितीत वृद्धांची काळजी घेण्याच्या दृष्टीने अनेक आव्हाने आहेत. त्यांचे कल्याण हा एक गंभीर प्रश्न आहे. त्यांचा सामाजिक सहभाग आणि निर्णय प्रक्रियेत त्यांची उपस्थिती सुनिश्चित केली पाहिजे. ते म्हणाले की 2020 च्या आकडेवारीनुसार 60 वर्षांवरील लोकांची संख्या 149 दशलक्ष आहे जी की 2050 पर्यंत दुप्पट होईल. शहरीकरणामुळे अडीच कोटी लोक शहरांमध्ये येत असून संयुक्त कुटुंब संस्कृतीला तडा जात आहे. या परिसंवादामुळे वृद्धांच्या कल्याणासाठी धोरणे आखण्यास मदत होणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.
प्रमुख पाहुणे प्रा. विजेंद्र कुमार म्हणाले की, तरुणांमध्ये ज्येष्ठांप्रती कर्तव्याची भावना निर्माण करण्याची गरज आहे. वृद्धांची वाढती संख्या प्रत्येकासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. आपल्या हक्कांबरोबरच कर्तव्यांचे पालन करताना ज्येष्ठांच्या अनुभवांचा फायदा घेतला पाहिजे. विविध कायद्यांचा संदर्भ देत ते म्हणाले की अलीकडच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. आपण आपला कौटुंबिक स्वभाव विसरू नये. वृद्धांच्या मानसिक व मनोवैज्ञानिक समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत असेही ते म्हणाले.
दि. 20 मार्च रोजी होईल समारोप
परिसंवादाचा समारोप 20 मार्च रोजी दुपारी 03 वाजता होईल. यावेळी विश्वविद्यालयाचे कुलसचिव डॉ. धरवेश कठेरिया स्वागत भाषण करतील. सत्राचे सहसंयोजक डॉ. के. बालराजु अहवाल सादर करतील. सत्राचे संचालन डॉ. मिथिलेश कुमार तिवारी करतील तर डॉ. शिवसिंह बघेल आभार मानतील.
प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत करताना परिसंवादाचे संयोजक प्रा. बंशीधर पांडे म्हणाले की परिसंवादाच्या निमित्ताने ज्येष्ठांचे कल्याण, सक्षमीकरण आणि सुरक्षेचा या स्वदेशी दृष्टीकोनातून विद्वान, संशोधक, अभ्यासक, हितधारक आणि संबंधितांमध्ये परस्पर संवाद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्येष्ठांच्या कल्याणासाठी योग्य रणनीती आणि कार्यक्रम विकसित करण्याच्या हेतुने या परिसंवादात चर्चा केली जाईल.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, कुलगीत व डॉ. जगदीश नारायण तिवारी यांनी सादर केलेल्या मंगलाचरणाने झाली. कार्यक्रमाचे संचालन सहायक प्रा. डॉ. शिवसिंह बघेल यांनी केले तर आभार सहा. प्रा. डॉ. के बालराजु यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी अधिष्ठाता, विभागप्रमुख, शिक्षक, प्रतिनिधी, शोधार्थी, विद्यार्थी आणि मुद्रित व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन सत्रानंतर हिंदी विविच्या साहित्य विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. अखिलेश कुमार दुबे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सत्रात मातृ सेवा संघ नागपूरच्या प्रा. ज्योती निसवडे, गुरु घासीदास विश्वविद्यालय, बिलासपूरच्या प्रा. सष्मिता पटेल, इग्नू, नवी दिल्लीचे जी. महेश, ए.एस.बी.एन., वर्धेच्या अमरीन लाला, अनिकेत समाज कार्य महाविद्यालय, वर्धा येथील डॉ. लोकेश नंदेश्वर यांनी परिसंवादाच्या विषयावर चर्चा केली.