लोकप्रवाह, चोपडा दि. ३० जून – भरदुपारी शहरातील सहकार नगर व त्र्यंबक नगर या भरवस्तीतील काॕलन्यांमध्ये घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी डल्ला मारला. याविषयी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीसांमार्फत तपासाची चक्रे गतीने फिरविण्यात आली असून दोन तपास पथके तयार करण्यात आली व एक पथक तपासकामी बाहेरगांवी पाठविण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहिल्या घटनेमध्ये शहरातील विद्याविहार काॕलनी जवळील सहकार नगर येथील रहिवासी दुध फेडरेशन येथून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी कैलास रामदास पाटील यांच्याकडे दुपारी दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलुप व कडीकोंडा तोडून प्रवेश करीत बेडरुममधील कपाटाचे ड्रावर व लॉकर तोडून रुपये ८५००० रोख, ५० ग्रॕम सोन्याची मंगलपोत व १ ग्रॕम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असे एकुण २,३५,०००/- रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. तसेच दुसऱ्या घटनेमध्ये त्र्यंबक नगर येथील रहिवासी शिक्षक संतोष शिवदास सोनवणे यांच्या घरीसुद्धा चोरट्यांनी भरदुपारी घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलुप व कडीकोंडा तोडून प्रवेश करीत बेडरुम मधील कपाटाचे ड्रावर व लॉकर तोडून रोख रक्कम रुपये ८०,००० व ५० ग्रॕम सोन्याची मंगलपोत असे एकुण रु. २,३०,०००/- रुपयाच्या मुद्देमालावर चोरट्यांनी हात मारला.
गुन्हा घडल्यानंतर या दोन्ही ठिकाणी सहाय्यक पोलीस अधिक्षक कृषीकेश रावळे, पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी पाहणी केली. दोन्ही घटनेमध्ये एकाच पद्धतीने चोरी झाल्याचे दिसून येत असल्यामुळे हे एकाच टोळीचे काम असल्याचे बोलले जात आहे. भरदुपारी झालेल्या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घरी फक्त गरजेपुरतीच रोख रक्कम ठेवावी. तसेच मौल्यवान दाग -दागिने शक्यतोवर बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावे. असे आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी केले व चोरट्यांना लवकरच जेरबंद करु असे सुद्धा त्यांनी सांगितले.
याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला सि.सि.टी.एन.एस. (भाग ५) गुरनं. २७३/२०२२ व २७२/ २०२२ नुसार भादंवि कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक कृषीकेश रावळे व पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण व पोलीस उपनिरीक्षक घनशाम तांबे करीत आहेत.
सहकार नगरमध्ये आदल्या दिवशी दुसऱ्यांकडे असाच चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. मात्र कुठल्याही प्रकारचे नुकसान न झाल्यामुळे घरमालकाने पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही. मात्र पोलीसांना याबाबतीत कळविण्यात आले होते. दुसऱ्याच दिवशी त्याच काॕलनीमध्ये दिवसा-ढवळ्या हि चोरी झाली. हे मात्र विशेष !
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...