टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 28 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात येणार असून जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्या मार्गदर्शनामध्ये वर्धा येथील रामनगर मधील एसटी महामंडळाच्या आगारातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिरात एसटी आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मौखिक आरोग्य तपासणी तसेच रक्त तपासणी देखील करण्यात आली. तंबाखू सेवनाने होणारे मानवी शरिरावर होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्यांना व्यसनापासून दूर होण्यासाठी करावयाचे उपाय याबाबत माहिती देण्यात आली. मौखिक आरोग्य तपासणी शिबिरात जवळपास 120 नागरिकांची तपासणी करण्यात आली.
यावेळी आगारप्रमुख युवराज राठोड, वरिष्ठ लिपीक एच. टी. खापरे, महाबाल्यचे कर्मचारी तसेच दंत आरोग्य तज्ज्ञ कृष्ण मांजरीवार उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सल्लागार डॉ. नम्रता सलुजा, सामाजिक कार्यकर्ता हर्षद ढोबळे व समुपदेशक राहुल बुचुंडे यांनी सहकार्य केले.