टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 27 : थकीत वेतनातील फरकाची रक्कम मंजूर करण्याच्या मोबदल्यात हजाराची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संदीप प्रभाकर महाजन (वय-४४, रा. निपाणे ता. एरंडोल) असं मुख्याध्यापकाचं नाव आहे. एरंडोल तालुक्यातील एका गावातील शाळेत तक्रारदार हे शिपाई म्हणून पदावर नोकरीला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे वेतनातील फरकाची रक्कम २ लाख ५३ हजार ६७० रुपये मंजूर करण्याचा प्रस्ताव त्यांनी जळगाव माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक त्यांच्याकडे पाठवला होता. दरम्यान हा प्रस्ताव मंजूर करून देतो, असे सांगून शाळेचे मुख्याध्यापक असणारे संदीप महाजन यांनी मंजूर रकमेच्या ५% म्हणजे १२,५०० रुपयांची लाचेची मागणी केली.
दरम्यान तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव येथील विभागाला तक्रार दिली. त्यानुसार पथकाने गुरुवारी २७ जून रोजी दुपारी सापळा १० हजाराची रक्कम स्वीकारतांना मुख्याध्यापक संदीप महाजन यांना पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी कासोदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई नाशिक परीक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे – वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार आदींच्या मार्गदर्शनाखाली व जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक पोलीस उपधिक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, ए. एन. जाधव यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ. सुरेश पाटील, रविंद्र घुगे, म.पोहेकॉ. शैला धनगर, पोना. बाळू मराठे, पोकॉ. प्रणेश ठाकूर, पोना. किशोर महाजन, पोना. सुनिल वानखेडे, पोकॉ. प्रदीप पोळ, पोकॉ. राकेश दुसाने, पोकॉ. अमोल सुर्यवंशी, पोकॉ. सचिन चाटे आदींच्या पथकाने कारवाई केली.