टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 29 (सचिन ओली )– हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात कार्यरत तलाठी संतोष पवार यांची कार्यालयात घुसून झालेल्या निघृण हत्येचा निषेध म्हणून वर्धा येथील महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी एक दिवशीय काम बंद करुन कडकडीत निषेध व्यक्त केला. व सदर दोषींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून मृतक व त्यांचे कुटुंबियांस न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर निवेदन हे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
हिंगोली जिल्हा येथील वसमत तालुक्यात तलाठी संतोष पवार यांची कार्यालयात घुसून भरदिवसा निघृण हत्या करण्यात आली या भ्याड हल्याचा निषेध वर्धा जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी व्यक्त करीत निवेदन दिले. यामध्ये ही हत्या एका तलाठयाची नसून ही समग्र महसूली व्यवस्थेची हत्या आहे. तसेच शासकीय कर्तव्ये बजावताना तलाठी व मंडळ अधिकारी यांचेवर होणारे जिवघेणे हल्ले ही नित्याचीच बाब झाली आहे. अवैध गौण खनिज ऊत्खणन व वाहतूक यासाठी मुख्यतः तलाठी व मंडळ अधिकारी हे संघटीत गुन्हेगारीतून अवैध गौण खनिज उत्खणनात सहभागी टोळयांच्या रोषास बळी पडत असून त्यावर संघटनांनी वारंवार मागणी करुनही शासनाने अद्यापही संरक्षणार्थ कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. परंतु कारवाया मात्र प्राधान्याने केल्या जातात. वसमत तालुक्यातील घटनेने त्यावर कहर केलेला आहे. केवळ संशयातून तलाठी आपल्या शेतीचा फेरफार इतर नातेवाईकांचे नांवे करुन देईल या काल्पनिक भितीने भरदिवसा तलाठी कार्यालयात घूसून निघृण हत्या करण्यात झाली. सदर दोषींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून मृतक व त्यांचे कुटुंबियांस न्याय मिळवून द्यावा. तसेच तलाठी व मंडळ अधिकारी यांचे संरक्षणार्थ शासन प्रशासनाने ठोस पावले उचलावी. यासाठी महाराष्ट्र राज्य तलाठी/पटवारी/मंडळाधिकारी समन्वय महासंघाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून वर्धा महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने दि.२९ रोजी एक दिवशीय कामबंद आंदोलन करण्यात आले.
सदर निवेदन देतेवेळी तहसीलदार संदीप पुंडेकर, नायब तहसीलदार बाळूबाई भागवत, नायब तहसीलदार डॉ. पराजे, मंडळ अधिकारी आर. झांबरे प्रवीण हाडे, शफी, राजेंद्र पुणसे, तलाठी प्रदीप इंगळे, तलाठी भोयर आदीसह इतर सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.