शुभम माळी, चोपडा, दि. 10 – सद्या संपूर्ण शहरात डेंग्यू सदृश लक्षणें असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या अनुषंगाने आरोग्य विभाग व नगरपालिका प्रशासनाकडून डेंग्यू प्रतिबंधासाठी विशेष आरोग्य जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे. तरी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा असे आवाहन करण्यात येत आहे.
डेंग्यू प्रतिबंधाविषयी माहिती देतांना काय म्हणाले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर… व्हिडीओ पहा 👇👇
दिनांक 09/9/2024 रोजी सुंदरगढी चोपडा येथे डेंग्यू रुग्णाच्या घरी भेट देऊन विशेष आरोग्य जनजागरण मोहीम अंतर्गत या भागात गृहभेटी देण्यात येवून कंटेनर सर्व्हेक्षण करण्यात आले. यावेळी डास अळी आढळून आलेली कंटेनर रिकामी करण्यात आली तसेच डास अळी आढळून आलेली परंतु जे रिकामी करता येत नाही त्या कंटेनर मध्ये “ॲबेट” हे अळीनाशक औषध टाकण्यात आले. व आठवडयातून एकदा “कोरडा दिवस” पाळण्यासाठी सुचना देण्यात आली. वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेबाबत माहिती देवून डेंग्यू , मलेरिया, झिका, चिकनगुणीया या आजाराबाबत जनजागृती यावेळी करण्यात आली. यावेळी किरकोळ आजारावर प्राथमिक औषधोपचार करून रक्त नमुने संकलीत करण्यात आले. किटकजन्य व जलजन्य आजाराबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक उपायोजना संदर्भात “आरोग्य शिक्षण” देण्यात आले.
यावेळी तालुका आरोग्य पर्यवेक्षक जोशी, तालुका आरोग्य सहायक जगदीश बाविस्कर, आरोग्य सेवक आर. एम. मडावी, दिनेश बारेला, आरोग्य सेविका सविता नाथबुवा, आशा स्वयंसेविका भारती शिंपी, मंगला निकुभे, ललिता चित्रकथी, नगरपालिका स्वच्छता कर्मचारी अजय चावरे, नितेश बेडवाल, गुलाब वाडे व सुभाष पवार आदींची उपस्थिती होती.