वर्धा दि. 14 : राज्य शासनाने नुकत्याच सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून योजनेच्या लाभाची रक्कम सुध्दा पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला बळ मिळाले असून यामुळे राज्याच्या आर्थिक प्रगतीला हातभार लागत असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. पंकज भोयर यांनी केले. आज महिला व बाल विकास विभाग आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्वावलंबी मैदान येथे आयोजीत महिला मेळाव्यात ते बोलत होते.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (बाल कल्याण) मनिषा कुळसंगे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश डडमल, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) किर्तीकुमार कटरे, नागपूरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील मेसरे, वर्धा व सेलू व देवळी तालुका मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समितीच्या अध्यक्ष वंदना भुते, विभा राऊत, सदस्य चित्रा ठाकुर, शुभांगी कुर्जेकार, सुजाता देशमुख, अनिता ठाकरे, निता हाटेकर, किर्ती सायंकार, नरेशकुमार उगेमुगे, दुर्गेश साटोणे आदी मंचावर उपस्थित होते.
लाडकी बहीण योजना बंद होणार अशा अफवा पसरविल्या जात आहे. यावर विश्वास न ठेवता या योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी शासनाच्या इतर लोककल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा. व इतरांनाही लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे भोयर म्हणाले. ही योजना कायस्वरुपी सुरु राहणार असल्याचे त्यांनी लाभार्थी महिलांना आश्वासित केले. यासोबतच योजनेच्या पात्र असलेल्या लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ सुध्दा देण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांनी अन्नसुरक्षा योजनेंतर्गत मोफत तीन गॅससिलेंडरचा लाभ मिळण्यासाठी पुरवठा विभागाशी संपर्क साधावा.
राज्य शासन महिलांच्या आर्थिक, सामाजिक व कौटूंबिक प्रगतीसाठी कटीबध्द असून महिलांसाठी महिला सम्मान योजनेंतर्गत एसटी प्रवासाकरीता मध्ये 50 टक्के सवलत, लेक लाडकी योजना अशा विविध योजना राबवित आहे. या योजनांचा महिलांनी लाभ घेऊन इतर महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन डॉ. पंकज भोयर यांनी केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत जिल्ह्यातील 3 लाख महिलांना लाभ मिहाला असून या योजनेच्या माध्यमातून महिलांची आर्थिक सामाजिक प्रगती साधन्यासाठी मोठा हातभार लागत आहे. जिल्ह्यात महिला बचत गटाचे फार मोठे जाळे असून बचत गटांना स्वयंपूर्ण करण्याकरीता उद्योग व्यवसायासाठी शासनाच्यावतीने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याचा लाभ महिला बचत गटांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
तत्पुर्वी कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या महिला बचत गटाव्दारे निर्मिती वस्तुच्या स्टॉलची मान्यवरांनी पाहणी केली. या स्टॉलवर बचत निर्मित विविध उत्पादने व वस्तू विक्रीसाठी उपलब्ध होत्या. या स्टॉलला महिला मेळाव्यात उपस्थित महिलांनी गर्दी केली.
यावेळी महिलाव्यात उपस्थित महिलांना महिलांचे आर्थिक सबळीकरण व सक्षमीकरण या विषयावर दुर्गेश साटोने, महिलांच्या सामाजिक सुरक्षा या विषयावर सुजाता देशमुख यांनी तर कायदेविषय विषयावर ॲड. अनिता ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ठ आयोजन व नियोजन केल्याबाबत डॉ. पंकज भोयर व जिल्हाधिकारी राहुल कर्डिेले यांनी जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किर्तीकुमार कटरे यांनी केले. संचालन ज्योती भगत व मोहन सायंकार यांनी संयुक्तपणे केले तर आभार रमेश डडमल यांनी मानले.