वर्धा दिनांक 6 : आगामी 15 व्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था व्यवस्थित रहावी याकरीता जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या वतीने सतर्कता बाळगली जात आहे. कायद्याचे काटेकोरपणे पालन व्हावं याकरीता वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सदैव तत्पर आहे. परंतु रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आर्वी नाका चौक, मानस मंदिर, स्वावलंबी ग्राउंड, पिपरी मेघे वॉर्ड नं 1, वॉर्ड नं 4, आदिवासी कॉलनी व कारला चौक आदी भागांमध्ये अनेक अवैध धंद्यानी डोके वर काढले असून त्यामध्ये प्रामुख्याने अवैध दारू धंद्यांमुळे परिसरातील सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. अनेक हॉटेल्समधून दारूचा महापूर वाहत आहे. व याच हॉटेलमधील मालकांसोबत पोलिसांचे संगनमत असल्यामुळे त्यांचे “भलं ” होत आहे.
एरवी सर्वसामान्य जनतेला कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली वेठीस धरणाऱ्या पोलीस प्रशासनाने दोन नंबरवाल्यांची हुजूरेगिरी करू नये, हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा..!
निवडणुक काळात हॉटेलमध्ये रात्री अनेक उमेदवारांचे प्रचारार्थी आपला थकवा दूर करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत रामनगर पोलीस स्थानकात नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षकांचे अशा अवैध धंद्यावर कोणताही प्रकारचे वचक राहिलेला नाही, असे दिसून येत आहे. पोलीस बंदोबस्त चोख राहावा म्हणून नुकताच पोलीस प्रशासनाच्या वतीने रूट मार्च काढून जनतेमध्ये तत्पर असल्याचे भासविले जात आहे. मात्र याच परिसरात हॉटेलमध्ये रात्री दारूचा महापूर वाहून भांडण तंटा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यातीलच “मोहरा” (माय नेम इस…..) मात्र स्वतःला सेफ ठेवून दिवाळीच्या काळात अनेक अवैध दारू विक्रेते व सट्टापट्टी वाल्यांकडून चांगलीच दिवाळी साजरी केली आणि याच पैशात स्वतःच्या दिवाळीची आतिषबाजी केल्याचे सुद्धा बोलल्या जात आहे. हा कर्मचारी कोण? याचा शोध पोलीस अधीक्षकांनी घेणे गरजेचे आहे. तसेच अवैध धंद्यावर अंकुश ठेवणेकामी योग्य ती कारवाई करणे आवश्यक असल्याचे सर्वसामान्य जनतेचे म्हणणे आहे.