वर्धा (प्रतिनिधी) दि. 11 – वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या वर्धा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना मतदारांच्या समक्ष प्रस्तुत करण्याकरिता शुक्रवार दि. 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता “प्रमुख उमेदवार, एका मंचावर” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणूक आखाड्यात उतरलेल्या उमेदवारांना मतदारांना ऐकता यावे याकरिता न्यू इंग्लिश हायस्कूलच्या जेलरोड स्थित विस्तीर्ण मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमात महायुती अर्थात भाजपाचे उमेदवार आमदार डॉ. पंकज भोयर, महाविकास आघाडी अर्थात कॉँग्रेसचे उमेदवार शेखर शेंडे, अपक्ष उमेदवार डॉ. सचिन पावडे, अपक्ष उमेदवार रवींद्र कोटंबकार यांच्यासह इतर 1 ते 2 उमेदवार सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमात दखलपात्र उमेदवारांनाच आमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमात उमेदवारांनाच आपली बाजू मांडायची असून, त्यांच्या प्रतिनिधींना बोलण्याची संधी दिली जाणार नाही. लोकशाहीच्या या सोहळ्यात मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी केले आहे.