चोपडा (प्रतिनिधी) दि. 12 – गेल्या अडीच वर्षांपूर्वी जे 40 गद्दार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले, त्यापैकी चोपड्याचे एक गद्दार होते. म्हणून चोपडावासियांना लागलेला गद्दारीचा टिळा या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र पुसून टाकावा लागणार असल्याचे मतदारांना आवाहन करताना शिवसेनेचे उबाठा गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चोपडा येथे केले. ते चोपडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार प्रभाकरआप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ दि. 11 रोजी रात्री 8.00 वाजता झालेल्या जाहीर सभेतून बोलत होते. दिनांक 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदार संघात जी निशाणी आहे, त्यात पेटती मशाल, हाताचा पंजा आणि तुतारी या सर्व चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी या सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी या सभेच्या माध्यमातून मतदारांना केले.
यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, उमेदवार प्रभाकरआप्पा सोनवणे, जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्ष इंदिराताई पाटील, चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन निताताई पाटील, प्रतिभा शिंदे, उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या जिल्हाप्रमुख रोहिणी पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या विजयाताई पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती डी.पी. साळुंखे, चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, जळगावच्या उमेदवार वैशाली महाजन, रावेर चे उमेदवार श्री चौधरी, भुसावळ येथील उमेदवार डॉ. राजेश मानवतकर यांचे सह महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, चोपड्यातून एक गद्दार झाला तरी नागरिक मात्र गद्दार गद्दार झालेले नाहीत. चोपड्याला लागलेला हा गद्दारीचा कलंक या विधानसभा निवडणुकीतून आपल्याला पुसून टाकावा लागेल. खरंतर गद्दारीचा डाग हा पुसला जात नाही कारण इतिहासात काळातील शिवाजी महाराजांसोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांचा डाग अजूनही पुसला जात नाहीये. हे तर काल-परवाचे गद्दार झालेले आहेत. यांच्यावरील गद्दारीचा डाग पुसून टाकला जाणार नाहीच. मात्र निवडणुकीच्या माध्यमातून यांना पराभूत करून यांच्यावरील डाग चोपडा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी पुसून टाकावा असेही भावनिक आवाहन उपस्थित नागरिकांना उद्धव ठाकरे यांनी केले.
चोपडा येथील गद्दार हा सध्या आमदार नाहीच आहे आणि होणारही नाही म्हणून आता या सर्व गद्दारांसाठी यांचे ‘वाजले की बारा जाऊ द्याना घरी’ असे म्हणून या सर्वांना घरी पाठवायचे आहे. 40 च्या 40 गद्दारांना ज्या त्या मतदारसंघातून मतदारांनी तिकीट देऊन यांची गुवाहाटी येथे रवानगी केली पाहिजे. यांना पुन्हा संधी देऊ नये, अशीही साद ठाकरे यांनी घातली.
महायुती सरकारच्या निर्णयावर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये देता, म्हणजे जसे काही तुम्ही त्यांना नोकरीला ठेवलेले आहे. कोणी या लाडक्या बहिणींना घरून पैसे देत नाही किंवा तुमच्या बापाचे पैसे तुम्ही यांना देणार आहात का? असाही प्रश्न यावेळेस उद्धव ठाकरे आणि निर्माण केला. म्हणून महाविकास आघाडीचे सरकार आले तर लाडक्या बहिणींना दरमहा 3000 हजार रुपये देणार आहोत. राज्यात मुलींना जसे मोफत शिक्षण दिले जाते तसेच त्यांच्यासोबत मुलांनाही मोफत शिक्षण देण्याचा महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात समावेश केलेला आहे. यासह जीवनावश्यक अशा पाच वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचाही जाहीरनाम्यातून निर्णय घेतलेला आहे. सध्या मिंधे सरकारच्या काळात आनंदाच्या शिधामध्ये उंदराच्या लेंड्या, अळ्या मिळून येत आहेत. म्हणून या मिंध्याला तुम्ही आता सांगा की, हा आनंदाचा शिधा तूच खा!,आनंदाच्या शिधा मध्ये अळ्या आणि लेंड्या निघतात आहेत, हा कसला आनंद आणि कसला आनंदाचा शिधा? असाही प्रश्न निर्माण केला.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. सध्या सगळीकडे जीएसटी आपल्या माथी मारला जात आहे. प्रधानमंत्री सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये दिले जातात. मात्र शेतकऱ्यांनी एक लाख रुपयांचे खत घेतले तर त्यावर 18% जीएसटी आकारला जातो. म्हणजे 18 हजार रुपये जीएसटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून घेतले जात आहेत.शेतकऱ्यांना दिलेले प्रधानमंत्री सन्मान योजनेतून 12 हजार रुपये वगळले तर सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खिशातून काढले जात आहेत, याचा अर्थ महायुती वाल्यांनी शेतकऱ्यांची ही लूटमार केली आहे. शेतीमालाला भाव देण्याऐवजी यांनी उत्पादन खर्च वाढविला आहे, म्हणून शेतकरी हा कधीही वर येऊ शकत नाही. या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या सरकारला घरचा रस्ता या निवडणुकीतून दाखवायचा आहे. असेही आवाहन उपस्थित नागरिकांना उद्धव ठाकरे यांनी केले.
उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे मशाल चिन्ह घेऊन चोपडा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांनीही मतदारांना मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.
या सभेतून विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, प्रतिभा शिंदे, वजाहत काझी, भाईदास कोळी, प्रा. शरद पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती डी.पी. साळुंखे, साखर कारखान्याच्या माजी चेअरमन नीताताई पाटील, राजू तडवी यांनीही महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ भाषणे केली.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...
वर्धा (प्रतिनिधी) दि. 11 - वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या वर्धा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना मतदारांच्या...