टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 13 : महाराष्ट्रातील मुख्य गायींमध्ये एक गवळाऊ गाय आहे. गवळाऊ गायींच्या संवर्धनासाठी कार्य करणे आवश्यक आहे. संवर्धन करताना त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. संशोधकांनी शेतात जावून संशोधन केले पाहिजे. पशुसंवर्धनाचा महत्त्वाचा आधार शेतकऱ्यांना होऊ शकतो. पण योजनांची चांगली अंमलबजावणी झाली पाहिजे. गवळाऊ जनावरांच्या संवर्धनाच्या अनुषंगाने प्रोजेक्ट तयार करावा. मात्र तो केवळ कागदोपत्री नसावा. त्याची अंमलबजावणी करत शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे, असे आमदार सुमीत वानखेडे म्हणाले.
जैव विविधता जतन मोहिम अंतर्गत दुर्मिळ होत चाललेल्या गवळाऊ जनावरांच्या संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापन याकरीता एक पाऊल म्हणुन महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ व महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांच्या सौजन्याने आणि पशुसंवर्धन विभाग व गौळाऊ गोवंश जतन, संवर्धन, संशोधन व पैदासकार चॅरिटेबल ट्रस्ट, तळेगाव (रघुजी) यांच्यावतीने शहीद स्मारक, मोरांगणा (खरांगणा) येथे एक दिवसीय गवळाऊ जनावरांचे प्रदर्शन पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुमित वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपुरचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, बोर्ड ऑफ डायरेक्टर माफसुचे सुधीर दिवे, एनबीएजीआरचे डॉ. डी. के. सदाना, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतीश राजू, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ पुंडलिक बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार बिडकर, गवळाऊ ब्रिडर्स असोसिएशन तळेगाव (रघुजी)चे पुष्पराज कालोकार उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी समयोचित विचार व्यक्त केले. प्रदर्शनीत सहभागी जनावरांचे परीक्षण जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, नागपुर डॉ. नितीन फुके, सहा. आयुक्त (नि) डॉ. प्रमोद शिंदे, सहाय्यक आयुक्त डॉ. अभय भालेराव, डॉ. चित्रा राऊत यांनी केले.
पुढे बोलतांना आ. सुमित वानखेडे म्हणाले दरवर्षी गिता जयंतीचे दिवशी हा कार्यक्रम आर्वी, आष्टी किंवा कारंजा तालुक्यात आयोजित करावा. पुढील काही वर्षात या तीन तालुक्याचे दुग्ध उत्पादन वाढविण्यासंदर्भात नियोजन करण्याबाबत उपस्थित पशुपालक तसेच अधिका-यांना सुचना दिल्या.
गवळावू गायींचे जतन, संवर्धन झाले पाहिजे. इंग्रजांनी या गायीचे महत्व ओळखले होते. सर्वात चांगले दूध गवळाऊ गायींचे आहे. गवळावू गायींचे संवर्धन करताना चारा, पाणी नाही म्हणून गोपालक स्थलांतर होणार नाही यासाठी काम करणे महत्त्वाचे आहे, असे सुधीर दिवे म्हणाले.
प्रदर्शनातील सहभागी उत्कृष्ट जनवरांना पारितोषिक देऊन गौरन्वित
गवळाऊ गाय गटामध्ये प्रथम पारितोषिक रुपेश माणिकराव अरबट, खरांगणा, द्वितीय पारितोषिक संजय शंकरराव गळहाट, भिवापुर हेटी, तृतिय पारितोषिक प्रविण दिलीपराव कोरडे, खरांगणा व चतुर्थ पारितोषिक हरिदास साहेबराव गळहाट, भिवापुर यांचे गवळाऊ गायीला मिळाले. गवळाऊ वळू गटामध्ये प्रथम पारितोषिक संजय विठोबाजी अवथळे, तळेगाव, द्वितीय पारितोषिक सूर्यदेव दत्तुजी सपकाळे, खरांगणा, तृतिय पारितोषिक अभय छगनराव कालोकार, तळेगाव व चतुर्थ पारितोषिक राधेश्याम रामेश्वरराव तराळे, खरांगणा यांचे गवळाऊ वळूला मिळाले. गवळाऊ वासरे (नर/मादी) गटामध्ये प्रथम पारितोषिक अभय छगनराव कालोकार, तळेगाव, प्रज्वल प्रविणराव साठे, भिवापुर हेटी, तृतिय पारितोषिक सूर्यदर्शन जनकराव साठे, कन्नमवारग्राम व चतुर्थ अशोक रघुनाथ तिवस्कर, हेटी यांचे गवळाऊ वासरांना मिळाले. पारितोषिक विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाच्या रक्कमेचा धनादेश व प्रमाणपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले.
प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पुंडलिक बोरकर, संचालन प्रसन्न बंब यांनी केले. आभार डॉ. राजेंद्र घुमडे यांनी मानले. यशस्वीतेकरीता डॉ. संजय खोपडे, डॉ. प्रविण तिखे, डॉ. सुरेश मांजरे, राजेंद्र घुमडे, सुरेंद्र पराते, अनिल हाडके, संजय चुटे, प्रदीप थुल, पुष्पराज कालोकार व गवळाऊ ब्रिडर्स असोसिएशनचे सदस्यांनी यांनी सहकार्य केले. यावेळी परिसरातील पशुपालक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदर्शनात 152 जणांचा सहभाग होता.