टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 30 : पारंपारीक अशा कबड्डी खेळाला प्राधान्य देऊन येथील तरुणांनी कबड्डी क्रिडा स्पर्धेचे आयोजन केले आहे. या क्रिडा स्पर्धेतून तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन सुदृढ आरोग्य राखण्यास मदत होईल, असे मनोगत राज्याचे गृह, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सेलू तालुक्यातील वडगाव जंगली येथे आयोजित कबड्डी क्रिडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.

जय घोंगडी बाबा व बिरसामुंडा क्रिडा मंडळ वडगाव जंगली यांच्यावतीने कबड्डी क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, सेलूचे तहसिलदार मलीक विराणी, अशोक कलोडे, जय घोंगडी बाबा व बिरसामुंडा क्रिडा मंडळाचे अध्यक्ष प्रफुल बैस आदी उपस्थित होते.
खेळाबरोबरच येथील तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन शिक्षित व्हावे व गावाचे नाव शिखराव पोहोचावे यासाठी वडगाव जंगली येथे ग्रंथालय निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार, त्याचबरोबर गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे पुढे बोलतांना डॉ. पंकज भोयर म्हणाले.
गावक-यांच्या व गावातील महिला बचत गटाच्यावतीने राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा नागरी सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिक, महिला, खेळाडू उपस्थित होते.