टिम लोकप्रवाह, वर्धा दि. ०७ – कोरोना सारखे लक्षण असलेल्या विषाणुने (Human Metapneumovirus (HPMV)) कोरोनाची आठवण ताजी केलेली आहे. सद्यस्थितित एचएमपीव्हीचे भारतामध्ये ४ रुग्ण आढळून आले असले तरी सदर आजाराबाबत कोरोनासारखी घाबरण्याची गरज नाही. कारण हा विषाणू नवीन नसून जुनाच आहे. महाराष्ट्रात आता पर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. या विषाणू विषयी चिंतेचे कारण नसल्याचे आरोग्य तज्ञांकडून सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाता कामा नये, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. व मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी केले आहे.

खबरदारी म्हणून सर्दी-खोकला आणि फुप्फुसाच्या गंभीर संसर्गाच्या ( सारी) रुग्णांचे नियमीत सर्वेक्षण सुरु करण्यात आलेले आहे. या विषाणूचा संसर्ग प्रामुख्याने लहान मुले व वयोवृध्द व्यक्तींना ( मधूमेह व उच्चरक्तदाब) होण्याची शक्यता जास्त असते. या आजाराला काही प्रतिबंधात्मक उपाय करून सुध्दा रुग्ण बरे होऊ शकतात. त्या बद्दल सार्वजनीक आरोग्य विभाग, वर्धा यांचेकडून नागरीकांना खालील प्रतिबंधात्मक सुचना देण्यात आलेल्या आहेत.
हे करा.
हे करा
जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका, साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारीत सॅनिटायझरने आपले हात वारंवार घुवा, ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर रहा, भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा, संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन ( व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.
हे करू नये
हस्तांदोलन, टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर, आजारी लोकांशी जवळचा संपर्क, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.
मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. वर्धा यांनी नागरीकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे व मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केलेले आहे.








