टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 11 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर होण्यासाठी अर्थात ईज ऑफ लिव्हिंगसाठी सात कलमी कृती कार्यक्रमाची घोषणा केली आहे. सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू असलेल्या या कृती कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी नियोजनबद्ध आणि समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी आज येथे दिल्या.
पुढील शंभर दिवसांत राबवायच्या सात कलमी कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे व विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
राज्यात प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत या बैठकीत सूचना देण्यात आल्या आहेत. विभागांनी सात कलमी कार्यक्रमाबाबत काय कार्यवाही केली, याबाबत 15 एप्रिल 2025 रोजी आढावा घेतला जाणार आहे. आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करणे, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे, संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करणे, शासकीय कार्यालयांची स्वच्छता करणे, अनावश्यक कागदपत्रे काढून टाकणे ही कामे प्राधान्याने हाती घ्यावी.
नागरिकांचे जीवन सुकर होण्यासाठी प्रत्येक विभागाने किमान दोन सुधारणा, नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबवावेत. पुढील शंभर दिवसांत प्रलंबित कामांची संख्या शून्यावर आणण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. तालुका व जिल्हा स्तरावरील सर्व अधिकारी लाभार्थ्याशी, नागरिकांशी संवाद साधून योजनांच्या अंमलबजावणी विषयी प्रतिक्रिया जाणून घेवून त्यानुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. तसेच शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांना भेटी देवून तेथील सुविधांचा आढावा घ्यावा. तसेच दर शुक्रवारी शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून निरुपयोगी साहित्य, कागदपत्रांची विल्हेवाट लावावी, असे त्यांनी सांगितले.
जात प्रमाणपत्र, नझुल पट्टे वाटप, घरकुल मंजुरी, जन्मदाखला, प्रॉपर्टी कार्ड, जमीन मोजणी, फेरफार, पांदण रस्ते मोजमाप, वैयक्तिक लाभाच्या योजना, दस्त नोंदणी, भाग नकाशे, बांधकाम परवानगी देणे, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, तक्रारीचे निर्धारित वेळेत निवारण व संवाद भेट याबाबत सुलभ व्यवस्था निर्माण करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. नागरिकांसोबत सौजन्यपूर्ण व्यवहार करावा व नागरिकांची कामे निर्धारित वेळेत करावी. विविध प्रमाणपत्र व योजनांचा लाभ देण्यासाठी तालुकानिहाय शिबिर आयोजित करण्यात यावी, असेही त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना
· विभाग, कार्यालयाचे वेबसाईट अद्ययावत करा
· ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करा
· शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहिम राबवा
· नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे निकाली काढा
· उद्योजकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या
· शासनाच्या महत्वाच्या प्रकल्प आणि योजनांच्या प्रकल्पांना भेटी द्याव्यात
· शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या
या सात कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयातून काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.