चार ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. आज (९ जुलै) कझाकिस्तानची एलेना रिबाकिना आणि ट्युनिशियाच्या ओन्स जेबुर यांच्यात महिला एकेरीची लढत झाली.
एलेना रिबाकिनाच्या रुपात विम्बल्डनला नवीन विजेती मिळाली आहे. पेट्रा क्विटोवानंतर रिबाकिना विम्बल्डन विजेतेपद पटकावणारी दुसरी सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. तिने ओन्स जेबुरचा ३-६, ६-२, ६-२ असा पराभव करून विम्बल्डनचे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे.
पहिला सेट जिंकल्यानंतर जेबुरला नंतर चांगला खेळ करता आला नाही. नंतरच्या दोन्ही सेटमध्ये तिला रिबाकिनाच्या आव्हानाचा सामना करता आला नाही. ट्युनिशियाची २७ वर्षीय जेबुर ही विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात पोहचणारी, अरब आणि आफ्रिकन देशांतील पहिली महिला ठरली होती. २३ वर्षीय रिबाकिनाने २०१९मध्ये वुहानमध्ये झालेल्या स्पर्धेत जेबुरचा पराभव केला होता. तर, गेल्या वर्षी जेबुरने रिबाकिनाला पराभूत करून हिशोब बरोबर केला होता.
The moment Elena Rybakina became a Wimbledon champion 👏 #Wimbledon | #CentreCourt100 pic.twitter.com/gVCU9oqxx5
— Wimbledon (@Wimbledon) July 9, 2022
रिबाकिना ही रशियात जन्मलेली आणि अजूनही मॉस्कोमध्ये राहणारी खेळाडू आहे. रिबाकिना अलेक्झांडर बुब्लिक आणि युलिया पुतिन्त्सेवा या खेळाडूंच्या स्ट्रिंगचा भाग आहे. जे खेळाडू कझाकिस्तासाठी खेळतात.
रिबाकिनाने विजेतेपदानंतर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “मी नि:शब्द आहे. प्रेक्षकांची गर्दी अविश्वसनीय होती. मी ओन्सचे अभिनंदन करू इच्छिते. ती इतर खेळाडूंसाठी एक प्रेरणा आहात. तिच्याविरुद्ध खेळणे खूप आनंददायी होते. अशा अविश्वसनीय वातावरणात खेळणे ही सन्मानाची गोष्ट आहे. मी अंतिम सामन्यात पोहचेल याची मला अपेक्षा नव्हती. मी माझी टीम आणि पालकांचे खूप आभार मानू इच्छिते.”
रिबाकिनाने अजला टॉमलजानोविकचा ४-६, ६-२, ६-३ असा पराभव करून अंतिम चारमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तिने सिमोना हालेपला ६-३ अशा समान सेटसह पराभूत करून ऐतिहासिक अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर दुसरीकडे, ओन्स जेबुरने उपांत्यपूर्व फेरीत मेरी बोझकोव्हाचा ३-६, ६-१, ६-१ असा पराभव केला होता. याशिवाय तिने, उपांत्य फेरीत तात्जाना मारियाचा ६-२, ३-६, ६-१ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.