दि. 16 जुलै : देशाची राजधानी दिल्लीतून एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालचे विद्यमान राज्यपाल जगदीप धनखड यांचं नाव जाहीर केलं आहे.
धनकर यांनी जुलै 2019 मध्ये पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचे सूत्र हाती घेतले होते. गेल्या तीन वर्षांच्या काळात धनकर आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात अनेक मुद्द्यांवरुन संघर्ष बघायला मिळाला आहे. त्यांच्या या संघर्षाची दखल भाजपच्या हायकमांडने घेतली आहे. त्यामुळे ममता दीदींसोबत राजकीय पंगा घेणाऱ्या राज्यपालांची आता उपराष्ट्रपतीपदी निवड होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे भाजपकडे बहुमत आहे. त्यामुळे धनकर यांचं उपराष्ट्रपती होणं सोपं आहे. पण लढाई वाटते तितकी देखील सोपी नाही. त्यामुळे देशाच्या उपराष्ट्रपतीपदी नेमकं कोण बसतं हे आगामी काळात लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
“जगदीप धनखड यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचं सुरुवातीचं शालेय शिक्षण हे गावातच झालं. त्यानंतर सैनिक स्कूलमधून त्यांनी शिक्षण घेतलं. त्यांनी राजस्थान विद्यापीठातून फिजिक्सचं शिक्षण घेतलं. ते फर्स्ट जनरेशनचे वकील बनले. त्यांनी खूप कमी वेळात राजस्थान हायकोर्टात स्वत:ला प्रसिद्ध वकील म्हणून नाव कमवलं. त्यानंतर सुप्रीम कोर्टातही ते नामांकित वकील म्हणून ओळखले गेले. सामाजिक कार्यात येण्यापूर्वी ते वकील होते. त्यांनी 1989 मध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक लढली तेव्हा ते सुप्रीम कोर्टात वकील होते. तेव्हा त्यांना विजय मिळाला होता. 1990 ते 1993 सालापर्यंत ते परराष्ट्रमंत्रालयाचे मंत्री राहिले. त्यानंतर ते राजस्थानच्या विधानसभेचे सदस्यदेखील राहिले.
त्यांनी जुलै 2019 मध्ये पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाची सूत्रे घेतली. ते खऱ्या अर्थाने नागरिकांचे राज्यपाल ठरले. त्यांचं कार्यकाळ पाहून भाजपने त्यांना उपराष्ट्रपतीचे उमेदवार ठरवलं आहे”, अशी माहिती भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिली.
राज्यपाल जगदीप धनखड आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वाद पश्चिम बंगास विधानसभेची गेल्यावर्षी निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीदरम्यान राज्यपाल जगदीप धनखड आणि ममता बॅनर्जी यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता. तेव्हापासून वारंवार धनखड आणि ममता दीदी यांच्यात संघर्ष बघायला मिळतो. जगदीप धनखड यांनी फेब्रुवारी महिन्यात ममता सरकारचं अधिवेशनचं अनिश्चित काळासाठी स्थगित केलं होतं. राज्यपालांनी आदेश काढत विधानसभेचं अधिवेशन स्थगित केलं होतं. त्यावेळी ममता सरकार आणि राज्यपाल यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता. विशेष म्हणजे ममता यांच्याकडून राज्यपालांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. यासाठी त्यांनी 1996 सालाचे हवाला जैन प्रकरणाचे दाखले दिले होते.
उपराष्ट्रपतीपदासाठी 6 ऑगस्टला मतदान भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती हे व्यंकय्या नायडू आहेत. त्यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2022 ला संपणार आहे. त्यांच्या कार्यकाळ संपण्याआधी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणं आवश्यक आहे. त्यामुळे उपराष्ट्रपतीपदासाठी 6 ऑगस्टला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार हे 19 जुलैपर्यत अर्ज दाखल करु शकतात. तर 20 जुलैला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. तसेच या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना 22 जुलैपर्यंत त्यांचा अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर 6 ऑगस्टला सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होईल. मतदानानंतर लगेच त्याचदिवशी मतमोजनी होईल आणि निकालही जाहीर होईल.