जागतिक आरोग्य संघटनेनं भारत नैराश्याशी झुंजणारा देश आहे असं स्पष्ट शब्दात नमूद केलं होतं. आत्महत्या हा नैराश्याचाच पुढचा टप्पा असतो. आणि आता सोशल मिडिया हाताशी आल्यानंतर प्रत्यक्ष आयुष्यात माणसं एकटी आणि एकाकी असली तरी आत्महत्या करताना जगाला त्या घटनेत सामावून घेण्याचा प्रयत्न केला जातो.
आत्महत्येची भावना प्रबळ होत जाणं, आता जगण्यात काही राम नाही असं वाटणं, कुणाशी तरी बोलून त्यातून मार्ग काढून पुन्हा आयुष्य ताब्यात घ्यावंसं न वाटणं ही सगळीच आधुनिक जगण्याची देण आहे. या सगळ्या अत्यंत दुर्दैवी घटनांमधील आत्महत्येची कारणं वेगवेगळी असली तरी स्युसाईड नोट फेसबुकवर टाकणं, स्वतःच्या मनातली व्यथा, आत्महत्येचे विचार सोशल मिडियाच्या माध्यमातून जगापर्यंत पोचवणं ही मानसिकता काय आहे याचा शोध घेणं आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे अशा स्युसाईड नोट्स ना लाईक करणाऱ्यांच्या मानसिकतेचा आणि सजग संवेदनशीलतेच्या अभावाचा हा प्रकार नक्की काय आहे हेही जरा समजून घेणं त्यानिमित्ताने गरजेचं आहे. कारण जगभर हा ट्रेंड पसरतोय. २७५० लोक बघतात आणि कुणीही त्या व्यक्तीला वाचवण्याचे प्रयत्न करत नाही. आत्महत्येच्या नोट्सना मिळणारे ‘लाईक्स’ मेंदू गोठून टाकणारे असतात. आत्महत्यांचं प्रमाण तर वाढत आहेच पण त्यातली सोशल मिडियाची भूमिका दुर्लक्ष करण्याजोगती राहिलेली नाही.
प्रत्येक क्षणी माणसांच्या मनात काय चालू आहे, ते काय विचार करत आहेत, त्यांना काय सांगायचं आहे या मूलभूत गोष्टीवर सोशल मीडिया चालतो. एरवी आपल्याला सतत आपल्या मनातले विचार कुणालातरी सांगायचे नसतात. पण सोशल मीडियावर अनेकदा तुमची गरज असो नसो, माणसं लिहीत राहतात. माणसांनी सतत लिहित राहिलं पाहिजे या गरजेवर या माध्यमाचं अर्थगणित चालत आणि माणसांच्या भावनांचंही. मुळात आत्महत्या करण्याची भावना जेव्हा तीव्र होते तेव्हा मनात प्रचंड निराशा, राग, फसवले गेल्याची भावना असते. सगळ्या गडद काळ्या भावनांनी मन व्यापलेलं असतं. आपल्या आत्महत्येच्या निर्णयाचं कारण जगाला कळलं पाहिजे ही भावना एरवीही आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या मनात असतेच. म्हणूनच लोक आत्महत्येचं कारण सांगणारी चिठठी लिहितात. पण सोशल मिडियामुळे सगळ्या जगाला आत्महत्येचं कारण ओरडून ओरडून सांगण्याची भावना तीव्र होत जाते. अनेकदा अशा पद्धतीने वागणाऱ्या माणसांच्या आयुष्यात त्यांना ऐकून घेणारं कुणीही नसतं. त्यांना जे ‘अटेन्शन’ अपेक्षित असतं ते मिळत नसतं. अपयश, एकादी चूक पचवता येत नाही. अनेकांना नाही ऐकण्याची सवय नसते. मनासारख घडलं नाही की माणसं निराश होतात आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यामातून आत्महत्येचं थेट प्रक्षेपण करतात. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली त्यांचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचीही भावना तीव्र असावी. ज्याने कुणी आपला छळ केलाय, ज्याने कुणी फसवले आहे त्याला कडक शासन व्हायला पाहिजे, तो/ती सुटता कामा नये याही भावना असतात बहुदा. काहीशी सुडाची भावना. म्हणूनही अनेकदा तपशिलाने आणि नावांसकट स्युसाईड नोट्स टाकल्या जातात.
‘फेसबुक डिप्रेशन’ नावाचा एक मानसिक आजार आता मानसोपचारतज्ञ अधोरेखित करू लागले आहेत. यात नैराश्यातून आत्महत्या करताना जसा स्युसाईड नोट्ससाठी फेसबुकचा वापर होतो त्याचप्रमाणे फेसबुकच्या अतिरेकी वापराने आत्महत्येची भावना प्रबळ होत जाते असंही या विषयातले तज्ञ मानतात.
Qntfy या हेल्थ अनॅलिटीक्स कंपनीचे सीईओ कॉपरस्मिथ यांच्यामते ऑनलाईन जगतात माणसे एकमेकांशी कोणत्या पद्धतीने कम्युनिकेशन करतात याची माहिती गोळा करून त्यातून काही ट्रेंड्स अधोरेखित करून आत्महत्येचे विचार करणाऱ्या लोकांपर्यंत ते कुठलाही भलता सलता निर्णय घेण्याआधी पोचता येऊ शकत. माणसं ऑनलाईन कशापद्धतीने संवाद साधतात, त्यातून त्यांची व्यक्तिमत्व कशी आहेत याचे अंदाज बांधण्याचे तंत्रज्ञान आज विकसित आहे. न्यूरो मार्केटिंग हे क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. याच सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानांचा, तंत्रज्ञानाच्या विकसित संकल्पनांचा वापर करून निराशेच्या गर्ते गेलेल्या, जाणाऱ्या माणसांना तिथून बाहेर काढण्यासाठी करता येऊ शकेल.
– मुक्ता चैतन्य