टिम लोकप्रवाह, दि. २८ एप्रिल, चोपडा – तालुक्यातील हातेड येथील शेतकरी यांनी बनावट खताबाबत केलेल्या तक्रारीवरुन शिरपूर तालुक्यातील तोंदे गावात किराणा दुकानाच्या गोदामात असलेला बनावट खताचा साठा जप्त करुन संबंधितांवर थाळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी तब्बल ५७ बनावट खतांच्या गोण्या जप्त करण्यात आल्या. सदर कारवाई जळगांव व धुळे जिल्हा कृषी विभागाने संयुक्तरित्या केली. या कारवाईमुळे बनावट खते व बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील हातेड येथील शेतकरी किशोर पाटील यांनी एमओपी (MOP) या खताच्या गुणवत्तेविषयी चोपडा कृषी विभागाकडे तक्रार केली. त्याअनुषंगाने तालुका कृषी अधिकारी दिपक साळुंखे व जिल्हा गुणवत्ता नियंत्रक अरुण तायडे यांनी प्रत्यक्ष तक्रारकर्ता शेतकरी यांच्याकडे जावून पाहणी केली असता सदर एमोपी (MOP) हे खत प्रथमदर्शनी बनावट असल्याचे आढळून आले. सदर बनावट खताच्या गोण्या या शिरपुर तालुक्यातील तोंदे येथील मंगलचंद झुंबरलाल जैन या व्यापाऱ्याने MOP खताच्या ०७ पिशव्या १७०० रुपये या दराने आणुन दिल्या असल्याचे तक्रारकर्ता शेतकऱ्याने सांगितले. याची पावती अथवा बिल दिले नव्हते. पुढील कारवाईसाठी कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी तक्रारकर्ता शेतक-याला विश्वासात घेवून सदर बनावट खताच्या पिशव्या परत करण्यास सांगितले. व सापळा रचून संशयीत ठिकाणी म्हणजेच सुरजमल मोहनलाल जैन यांच्या किराणा दुकानाच्या गोदामात छापा मारला असता त्याठिकाणी एमओपी (MOP) आयपीएल कंपनीच्या बनावट खताच्या ५० किलो वजन असलेल्या तब्बल ५७ बॕगा आढळुन आल्या. सदर बॕगा या विना बॕच नंबर व आयपीएल कंपनीची नक्कल केली असल्याचे आढळून आले. असली व बनावट बॕगेच्या रंग व छपाईमध्ये सुद्धा बरीच तफावत आढळुन आली. सदर साठ्याबाबत गोडाऊन मालकास विचारणा केली असता त्याने सदर खताचा साठा कैलास वासुदेव पाटील रा. तोंदे यांचा असल्याचा सांगितला. गोडावून मालक सुरजमल मोहनलाल जैन यांनी दिलेल्या कबुली जवाबावरुन कैलास वासुदेव पाटील यांनी सदरचे बनावट एमओपी (MOP) खत हे विक्रीसाठी आणले हे सिध्द झाले. त्यावरुन कैलास पाटील यास विचारणा केली असता सदरचे खत हे किशोर शालीकराव पाटील रा. करवंद ता. शिरपूर यांनी बिगर बिलाचे दिले असल्याचे सांगत इतर उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे सदर खत बनावाट असल्याची खात्री झाल्यामुळे शासकीय पंच व गावातील व्यक्ती यांच्यासमक्ष आयपीएल कंपनीच्या एमओपी खताचा नमुना नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. या कारवाईत तब्बल ९६,९०० रुपयांचा बनावट खताचा साठा जप्त करून त्याच गोडावूनमध्ये ठेवुन गोडावून पंचासमक्ष सिलबंद करण्यात आले. याबाबत पंचनामा करून कबुली जवाब घेण्यात आला.
आरोपींनी संगनमताने नकली खत शेतक-यांना विक्रीसाठी आणल्याने शेतक-याची व शासनाची फसवणुक केल्याने मंगलचंद झुंबरलाल जैन व कैलास वासुदेव पाटील दोघेही रा. तोंदे ता. शिरपुर जि. धुळे व किशोर शालिकराव पाटील रा. करवंद ता. शिरपुर जि.धुळे यांच्याविरुध्द भादंवि कलम 420, 468 खत नियंत्रण आदेश 1985 मधील खंड 7, 8, 19(अ), 19 (क) (2) 19(क) (3) (6) 35 (1) (अ), 35 (1) (ब) व जिवनावश्यक वस्तु कायदा 1955 मधील कलम 3 (2) (ड), 7, 9, 10 नुसार थाळनेर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा हा धुळे जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक मनोजकुमार शिसोदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आला आहे.
शेतकरी बांधवांनी बिलाशिवाय कुठलेही बियाणे किंवा खतांची खरेदी करु नये. कारण यामुळे आपली फसवणूक होवू शकते. त्यामुळे अशी कुठलीही फसवणूक होत असेल तर त्वरीत आपल्या क्षेत्रातील कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे.