टिम लोकप्रवाह, ०२ मे, चोपडा – भारतीय जैन संघटनेच्या (बी जे एस) कार्याची मुहूर्तमेढ ही जळगावमधून रोवली गेली आणि आता हे कार्य देशभर पसरले. लवकरच जागतिक जैन संघटनेची सुरुवात होणार असून या कार्याला व्यापक स्वरूप लाभणार आहे. बदलत्या परिस्थितीनुसार काळाची गरज ओळखून वैज्ञानिक दृष्टीकोणातून आखलेले विविध कार्यक्रम बीजेएसच्या माध्यमातून देशभर राबविण्यात येतात. व्यथांची कथा न करता प्रत्येक समस्येवर गंभीररित्या काम करणारी ही संस्था असून आदर्श समाजाची निर्मिती हेच बीजेसचे ध्येय आहे. विकसित भारताच्या निर्माणामध्ये बीजेएसची महत्त्वपूर्ण भूमिका असली पाहिजे यासाठी अखंडपणे काम सुरू असल्याचे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष नंदकिशोर मंगलचंद सांखला यांनी केले. भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) चोपडा शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी ते आनंदराज पॅलेस येथे बोलत होते. यावेळी मंचावर भारतीय जैन संघटनेचे राज्यसचिव दिपक चोपडा, विभागीय अध्यक्ष डॉ. अशोक श्रीश्रीमाळ, विभागीय उपाध्यक्ष लतिष सांड, जिल्हाध्यक्ष सुमित मुणोत यांच्यासह चोपडा वर्धमान जैनश्रीसंघाचे संघपती गुलाबचंद देसरडा, वर्धमान स्थानक जैनश्रीसंघाचे अध्यक्ष प्रदीप बरडीया, चोपडा शाखेचे नूतन अध्यक्ष निर्मल बोरा, मानसी राखेचा, सचिव गौरव कोचर हे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. अशोक श्रीश्रीमाळ, दीपक चोपडा व पूजा बोरा यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी बोलताना नंदकिशोर सांखला पुढे म्हणाले की, संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून भविष्यकालीन शिक्षणाचा विचार करून आजच त्याची पायाभरणी केली जात आहे. चौथी व आठवीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेऊन त्यांचा कल ओळखण्यात येतो व त्यांना त्यादृष्टीने तयार केले जाते. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले जाते. तसेच महिला सक्षमीकरण, स्मार्ट गर्ल, मुलांशी मैत्रीपूर्ण नातं निर्माण करणे, विवाह जुळवणे व ते टिकवणे यासाठी समुपदेशन या माध्यमातून कुटुंबातील सौदार्हपूर्ण वातावरणासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. पाणी हा धर्म, श्रद्धा आणि आस्थेचा विषय असून त्यासाठी संघटनेच्या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे कार्य हाती घेण्यात आले आहे. या कार्याचा भारत सरकारच्या नीती आयोगाने गौरव केला असून बीजेएसची ही योजना आता देशपातळीवर राबविण्यात येत आहे. या माध्यमातून सामूहिक पुण्यार्जनाचे काम केले जात आहे. येत्या तीन वर्षात भारतातील १०० जिल्हे जलपर्याप्त करण्याची जबाबदारी बीजीएस कडे सोपविण्यात आली आहे. अल्पसंख्यांक जागृती अभियानातून समाजासाठी सुरक्षा कवच निर्माण करणे सोबतच सामाजिक नीतीमूल्यांचे संवर्धन व्हावे या दृष्टीने विविध कार्यक्रम भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून आयोजित केले जातात. त्यासाठी संघटनेकडे प्रशिक्षित कार्यकर्त्यांची उत्तम फळी आहे. याचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करीत त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व बीजेएसच्या कार्याला मदत करणाऱ्या चंद्रहास गुजराथी, नेमीचंद कोचर, संजय चंपालाल जैन, दीपक रतिलाल जैन, सुनील तिलोकचंद जैन, डॉ. निर्मल टाटीया, पूजा बोरा, दीपक राखेचा, प्रवीण राखेचा, सुगनचंद बोरा, तिलेश शहा, डॉ. ऐश्वर्या टाटीया, प्रदीप बरडिया व सुनील बरडीया यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक राखेचा यांनी केले. तर सूत्रसंचालन संजय बारी यांनी व आभारप्रदर्शन आदेश बरडीया यांनी केले. प्रारंभी कु. मोक्षिता बोरा हिने नवकार मंत्र तर बीजेएस महिला मंडळाने स्वागत गीत सादर केले.
Post Views: 706