टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १९ – शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शहरापासुन ५ किलोमीटर अंतरावर धनवाडी रस्त्यावरील शेतात एका महिलेची निर्घुण हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली. पोलीस अधिकारी, कर्मचारी, फाॕरेंसिक टिम व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले असून मृत महिलेच्या पतीला संशयित म्हणून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरापासून ५ किलोमीटर दुर असणाऱ्या धनवाडी रस्त्यावरील कैलास सुकदेव पाटील रा अव्हाणे ता. जि. जळगांव यांचे मालकीची धनवाडी शिवारातील शेतगट क्रंमाक 101 यामधील कापुस पिकाचे शेतामध्ये दिनांक 19/12/2023 रोजी सकाळी 08.00 वाजेदरम्यान कापुस पिकाचे शेतामध्ये यातील मयत महिला नामे रेखाबाई दुरसिंग बारेला वय ४४ रा. पांजरिया ता. वरला जि. बडवाणी (मध्यप्रदेश) व तिचा पती आरोपी दुरसिंग टेटिया बारेला रा.पांजरिया ता. वरला जि. बडवाणी (मध्यप्रदेश) यांचेमध्ये पैसे मागण्याचे कारणावरुन भांडण होवुन भांडणामध्ये यातील आरोपी पती दुरसिंग टेटिया बारेला मृत महिला रेखाबाई बारेला हिला लाकडी दांडक्याने डोक्यास, तोडांवर डाव्या हानुवटीवर, शरीराच्या वेगवेगळया भागावर ब-याच ठिकाणी मारहाण करुन गंभीर दुखापती करुन जिवेठार मारुन घटनास्थळावरुन पळुन गेला म्हणून चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे CCTNS गुन्हा. रजि. नंबर 633/2023 भावि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी पती दुरसिंग टेट्या बारेला यास हवालदार संतोष पारधी व विलेश सोनवणे यांनी तात्काळ शोध घेवून ताब्यात घेतले आहे.
सदर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग सुनिल नंदवालकर, चोपडा ग्रामीणचे सपोनि शेषराव नितनवरे, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोउनि. घनशाम तांबे आदिंनी भेट दिली. त्याचप्रमाणे पोहेकाँ. शेषराव तोरे, ज्ञानेश्वर जवागे, विलेश सोनवणे, संतोष पारधी, जितेंद्र सोनवणे, संदिप भोई, प्रकाश मथुरे, किरण गाडीलोहार आदिंसह इतर शहर पो.स्टे. कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रविण मांडोळे, संदिप पाटील आदिंसह फाॕरेंसिक टिम व श्वानपथक सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे करीत आहे.