टिम लोकप्रवाह, वर्धा दि. २० :- भरधाव येत असलेल्या टिप्पर चालकाने निष्काळजीपणे घाईत ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षात असलेले दोन प्रवाशी जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले.
पढेगाव येथून वर्ध्याकडे येत असलेल्या रिक्षाक्रमांक MH 32 B7545 ला समोरुन भरधाव येणाऱ्या टिप्पर क्रमांक MH 29 T 0783 ने जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षातील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. आकाश किसनाजी गांजरे रा. सालोड व संजय कमलाकर सायंकार रा. पडेगाव अशी मृतांची नावे असून तर गंभीर जखमीमध्ये रुपाली अमोल झाडे, अर्थव अमोल झाडे व ऑटोचालक दिनेश नारसे यांचा समावेश आहे अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी धाव घेत जखमींना सावंगी येथील रुग्णालयात दाखल केले.
सदर अपघात हनुमान मंदिर जवळ वर्धा ते देवळी रस्त्यावर झाला. रिक्षा चालक दिनेश नारसे हा पढेगाव येथून प्रवाशांना बसवून वर्ध्याकडे येत होता. दरम्यान समोरुन भरधाव येत असलेल्या टिप्पर चालकाने निष्काळजीपणे घाईत ओव्हरटेक करण्याच्या नादात रिक्षाला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा चेंदामेंदा होत दोघांचा जागीच मृत्यू झाला.