सचिन ओली, लोकप्रवाह वर्धा दि. २९ : शहरालगत असणाऱ्या बोरगाव (मेघे) ग्रामपंचायतीतील वॉर्ड नं. १ मध्ये अवैधरित्या मोबाईल टॉवर रातोरात उभारण्यात आल्यामुळे खळबळ उडाली. सदर टॉवर हे उमेश चौधरी यांच्या घरावर उभारण्यात आले असून याकरीता ग्रामपंचायतीकडून लागणारे नाहरकत प्रमाणापत्र घेण्यात आले नसल्याने परिसरातील रहिवासीयांनी आश्चर्य व्यक्त केले. नागरिकांनी सदर बाब माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज सायंकार यांच्या निदर्शनात आणून दिली. व या मोबाईल टॉवरमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होवू नये याकरीता सदर अवैध मोबाईल टॉवर हटविण्यात यावे, अशी मागणी केली.
त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज सायंकार यांनी सर्व नागरिकांना घेवून जात वर्धा जिल्हा परिषदेतील उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) ज्ञानदा फणसे यांचे दालन गाठले. व अवैध मोबाईल टॉवर बद्दलची समस्या सांगून त्यांना सदर मोबाईल टॉवर हटविण्याबाबत योग्य ती कारवाई करणेकामी निवेदन दिले. कार्यतत्पर महिला अधिकारी ज्ञानदा फणसे यांनी ताबडतोब वर्धा गट विकास अधिकारी यांना सुचना देत सदर प्रकरणी चौकशी करीत कारवाई करणेस सांगितले. त्यानंतर बोरगाव मेघे येथील नागरिकांनी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज सायंकार यांनी अधिकाऱ्याचे आभार मानले.