टिम लोकप्रवाह, वर्धा दि. २१ – अवयवदान चळवळीला चालना देण्यासाठी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ यांच्याद्वारे नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला २५ लाख रुपयांची देणगी देण्यात आली. वंचित आणि गरजू रुग्णांसाठी अवयव प्रत्यारोपणाची सुविधा सहजपणे उपलब्ध व्हावी, यासाठी हा निधी देण्यात आला.
महाराष्ट्रात मोहन फाउंडेशन, राज्य सरकार आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान उपक्रम राबविला जात आहे. यापूर्वी मोहन फाऊंडेशनद्वारे महाराष्ट्रातील पाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अवयवदान जागृतीसाठी समुपदेशकांची नियुक्त करण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला. मात्र या सामंजस्य करारात आर्थिक नियोजनाबाबत स्पष्टता नसल्यामुळे या उपक्रमात अडथळे आलेत. ही अडचण दूर सारण्यासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोहन फाउंडेशनने नियुक्त केलेल्या समुपदेशकांच्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यास मेघे अभिमत विद्यापीठाने पुढाकार घेतला. कुलपती दत्ता मेघे यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना २५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी आमदार समीर मेघे, विद्यापीठाचे प्रधान सल्लागार सागर मेघे, राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, मोहन फाउंडेशनच्या वीणा वाठोडे, तसेच मेघे अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे, विशेष कार्य अधिकारी डाॅ. अभ्युदय मेघे, संचालक डाॅ. अनुप मरार, दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. उज्वल गजबे, सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. हसन मुश्रीफ यांनी यावेळी सावंगी मेघे रुग्णालयाद्वारे सातत्यपूर्वक होणारे अवयवदान व प्रत्यारोपण कार्याची दखल घेत नागपूरमधील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी केलेल्या परोपकारी कार्याबद्दल मेघे समूहाचे कौतुक केले. ज्यांना आर्थिक अडचणींमुळे खाजगी रुग्णालय व वैद्यकीय संस्थांमध्ये अवयव प्रत्यारोपण प्रक्रिया परवडत नाही, त्या वंचितांसाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे, असे ना. मुश्रीफ म्हणाले. केवळ अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठीच नव्हे तर मूत्रपिंड, यकृत आणि हृदय प्रत्यारोपणाच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, अशी कृतज्ञता नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी व्यक्त केली.
दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, मोहन फाऊंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील सामंजस्यातून अवयवदान चळवळ आणि अत्याधुनिक प्रत्यारोपण सुविधांचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.