टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 3 : येथील सेलू तालुक्यातील घोराड येथे आयोजित बैलपोळ्यात शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आणि संताप अनोख्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. “लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिना, शेतकऱ्यांच्या खिशातून गुंडाळी योजना,” “मत द्या आम्हाला, फुकट देतो तुम्हाला,” आणि “शेतकऱ्याचे दुःख कळेना, एमएसपीचा भाव कधी मिळणार?” अशा एकापेक्षा एक तीव्र घोषवाक्यांनी बैलांच्या पाठीवर सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. शासनाच्या विविध योजनांच्या आमिषावर शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. मात्र, अजूनही शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली जात नाही, ही खंत शेतकऱ्यांमध्ये दिसून आली.
“फुकट देतो तुम्हाला,” या वाक्यातून शासनाच्या योजनेवर कटाक्ष टाकत, शेतकऱ्यांचे दुःख आणि अडचणी व्यक्त करण्यात आल्या. बैलपोळ्यात शेतकऱ्यांनी सरकारकडून कधीही न मिळालेल्या एमएसपी (किमान आधारभूत किंमत) बाबत नाराजी व्यक्त केली. “एमएसपीचा भाव कधी मिळणार?” असे प्रश्न विचारत, शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्यांना वाचा फोडली.
एक गाव एक पोळा या संकल्पनेतून तालुक्यातील अनेक गावात साधेपणाने व एकोप्याने हा सण साजरा करतात. घोराड येथील पोळ्यात दरवर्षी जवळपास आठशे बैल जोड्या सहभागी होतात.
घोराड येथील शेतकरी सुनील पोहाणे हे त्यांच्या बैलजोडीच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक विषयाबाबत समाजप्रबोधन करीत असतात. यंदाही चित्रकार आशिष पोहाणे यांनी आपल्या कुंचल्यातून विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बैलांवर रंगांची उधळण करीत विशेष लक्ष वेधले. त्यांनी त्यांच्या बैलांच्या पाठीवर या घोषवाक्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची व्यथा आणि शासनाच्या धोरणांवर टीका केली. या अनोख्या घोषणांनी शेतकऱ्यांनी त्यांच्या दुःखाला समाज आणि सरकारसमोर आणण्याचा प्रयत्न केला. पंचक्रोशीत या अफलातून कल्पकतेची सध्या सर्वत्र चर्चा आहे, परंतु शासनाला जाग कधी येणार, हाच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.