चोपडा दि. 28 – चोपडा विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने शिंदेसेनेचे विद्यमान आमदार लताताई सोनवणे यांचे पती प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे शिंदे सेने तर्फे नाव निश्चित झाले आहे. चंद्रकांत सोनवणे हे 2014 ते 2019 काळात निवडून आलेले होते. आता त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी तर्फे चोपडा विधानसभा मतदार संघ हा उबाठा कडे गेल्याने उमेदवार कोण द्यावा? याबाबत त्रांगडे दि. 28 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर अखेर त्रांगडे संपले आणि जळगाव येथील रहिवासी प्रभाकर गोटू सोनवणे यांच्या गळ्यात उमेदवाराची माळ पडली आहे.
प्रभाकर सोनवणे हे गेल्या पंचवार्षिक वेळी ही अपक्ष म्हणून चोपडा विधानसभा मतदारसंघातून रिंगणात होते. त्यावेळी त्यांनी 32 हजार मते मिळवली होती. प्रभाकर सोनवणे हे चोपडा व यावल तालुक्यात परिचित चेहरा आहे. उमेदवारी दाखल करण्याचा दि. 29 शेवटचा दिवस असल्याने दि. 29 रोजी ते उमेदवारी दाखल करणार आहेत. तसेच उमेदवारी दाखल करण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे हेही दि. 29 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने तहसील कार्यालयाला गर्दीचे स्वरूप प्राप्त होणार आहे. दोन्ही उमेदवार हे शक्तिप्रदर्शन करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जमविणार असल्याचे सांगितले जात आहे. समोरासमोर लढत होण्याची दाट शक्यता आहे.